राज्यात जम्बो उत्पादनामुळे साखर निर्मितीत 20 टक्के वाढ | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sugar production

राज्यात जम्बो उत्पादनामुळे साखर निर्मितीत 20 टक्के वाढ

मालेगाव (नाशिक) : सलग दोन वर्षे झालेल्या समाधानकारक पावसामुळे यंदा राज्यात उसाचे जम्बो उत्पादन झाले. या वर्षी २०० साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला. याशिवाय राज्यभरातील हजारो रसवंतिगृहांमधून उसाचे गाळप झाले. तरीदेखील शिल्लक उसाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. पावसाळा तोंडावर असताना जूनच्या पहिल्या आठवड्यातही राज्यातील २६ साखर कारखाने अजूनही सुरू आहेत. आतापर्यंत साखर कारखान्यांमधून एक हजार ३१७ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. गेल्या वर्षी संपूर्ण हंगामात एक हजार १४ लाख टन उसाचे गाळप झाले होते. गेल्या वर्षाच्या तुलनेने साखर उत्पादनात २० टक्के वाढ अपेक्षित आहे.

मुबलक उसामुळे राज्यात १०१ सहकारी व ९९ खासगी अशा एकूण २०० कारखान्यांचा गळीत हंगाम ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरू झाला. गेल्या वर्षी हीच संख्या १९० होती. या वर्षी ऊस उपलब्ध असल्यामुळे बहुतांश कारखाने मेअखेर सुरू राहिले. कोल्हापूर, अमरावती व नागपूर या तीन विभागांतील सर्व कारखाने बंद आहेत. पुणे विभागातून केवळ एक कारखाना, तर सोलापूर विभागातून तीन कारखाने सुरू आहेत. नांदेडमधून सहा, अहमदनगर पाच, तर औरंगाबाद विभागातून सर्वाधिक ११ कारखान्यांचा गळीत हंगाम अद्यापही सुरू आहे. १० ते १५ जूनपर्यंत हे कारखाने सुरू राहू शकतील. हंगाम संपल्यानंतरही शिल्लक उसाचा प्रश्‍न कायम राहण्याची शक्यता आहे.

चार महिन्यांपासून राज्यभरातील हजारो रसवंतिगृह सुरू आहेत. त्यामुळे हजारो टन ऊस रसवंतींना लागला. गेल्या वर्षापेक्षा या वर्षी आतापर्यंत ३०५ लाख क्विंटल साखरेचे अधिक उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी संपूर्ण हंगामात एक हजार ६४ लाख क्विंटल उत्पादन झाले. या वर्षी ३ जूनअखेर एक हजार ३६९ लाख क्विंटल साखरेचे गाळप झाले असून, काही कारखाने अजून दहा ते बारा दिवस सुरू राहतील. त्यामुळे या वर्षी राज्यात साखरेचे विक्रमी उत्पादन होणार आहे.

औरंगाबाद विभागात शिल्लक उसाचा प्रश्‍न अधिक तीव्र आहे. विभागात १४ सहकारी व ११ खासगी असे एकूण २५ कारखाने सुरू झाले. ३ जूनअखेर १४ कारखान्यांचा हंगाम संपला. अजूनही ११ कारखान्यांमधून उसाचे गाळप केले जात आहे. हंगाम लांबल्यामुळे बहुसंख्य ऊसतोडणी कामगारही अजूनही गावी परतलेले नाहीत.

३ जूनअखेर ऊसगाळप स्थिती

विभाग कारखान्यांची संख्या ऊसगाळप (लाख टन) साखर उत्पादन (लाख क्विंटल) बंद झालेले कारखाने

कोल्हापूर ३६ २५४.६९ ३००.४१ ३६

पुणे ३० २६९.८५ २९१.२४ २९

सोलापूर ४७ ३००.१४ २८३.९१ ४४

अहमदनगर २८ १९९.३७ १९९.७२ २३

औरंगाबाद २५ १३१.७४ १२८.३७ १४

नांदेड २७ १४६.४३ १५२.४७ २१

अमरावती ३ १०.०३ ९.६७ ३

नागपूर ४ ४.५५ ३.८२ ४

एकूण २०० १३१६.८ १३६९.६१ १७४

हेही वाचा: नाशिक : खरिपामुळे शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी लगबग

"राज्यातील मराठवाडा विभागातील काही साखर कारखाने अद्याप सुरू आहेत. १५ जूनपर्यंत कारखाने सुरू राहिले तरीदेखील ऊस शिल्लक राहणार आहे. शासनाने शिल्लक उसापोटी शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये अनुदान देऊन दिलासा द्यावा."

- कुबेर जाधव, समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र

हेही वाचा: दीड एकरवर आधुनिक रेशीम शेती; वर्षाला 8-9 लाखांचे विक्रमी उत्पन्न

Web Title: Sugar Production Is Expected To Increase By 20 Per Cent Over Last Year In Maharashtra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top