milk.jpg
milk.jpg

आदिवासी विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ! पालकांच्या तक्रारीनंतर प्रकार उजेडात; वाचा काय घडले?

नाशिक : (कळवण) सरकारी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ करण्याचा प्रकार पालकांच्या तक्रारीनंतर उजेडात आला आहे. कोरोना विषाणू संसर्ग फैलावात मुदत संपलेल्या सुगंधी दुधाचा पुरवठा करण्यात आला. ठेकेदारांचे उखळ पांढरे करण्यासाठी यंत्रणेच्या विरुद्ध कळवण-सुरगाण्याचे आमदार नितीन पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिवासी विकासमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्याकडे केली आहे. तसेच आदिवासी विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या ठेकेदार आणि यंत्रणेविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

ठेकेदारांचे उखळ पांढरे करणाऱ्या यंत्रणेची तक्रार 

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर आश्रमशाळा बंद केल्याने आणि नंतरच्या लॉकडाउनमध्ये एक लाख लिटर आणि १८ हजार २७९ लिटर टेट्रापॅक दुधाचे वाटप आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना करण्याबाबतचा प्रस्ताव आदिवासी विकास आयुक्तालयातर्फे सरकारला पाठविण्यात आला होता. त्यानुसार शिल्लक असलेले योग्य दूध वैधता दिवसापूर्वी विद्यार्थ्यांना देण्याचे आदेश आदिवासी विकास विभागाने २ सप्टेंबरला काढले. वैधता दिवस उलटून गेलेल्या दुधाच्या ब्रिकचे वाटप होणार नाही, याची खबरदारी प्रकल्पाधिकाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचना त्यात देण्यात आल्या होत्या. त्याआधारे कळवण प्रकल्पाधिकारी कार्यालयातर्फे दुसऱ्या दिवशी दूध वाटपाच्या सूचना सरकारी आश्रमशाळांच्या मुख्याध्यापकांना पत्राद्वारे देण्यात आल्या. त्यासाठी ४ ते ७ सप्टेंबरपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला दोन आणि ८ सप्टेंबरला तीन ब्रिक्स वाटपाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले. वैधता संपलेल्या दुधाचा पुरवठा केल्यास व विद्यार्थ्यांच्या आरोग्यासंबंधी प्रश्‍न उद्‌भवल्यास त्यासंबंधीची जबाबदारी मुख्याध्यापकांवर देण्यात आली. 

वैधता संपलेल्या ब्रिक्स विद्यार्थ्यांच्या हातात 

विशेष म्हणजे १ सप्टेंबर व १० सप्टेंबर २०२० ही दुधाची वैधता आहे. मार्चमध्ये पॅकिंग केलेले सुगंधी दूध मागील चार दिवसांत कळवण व सुरगाणा तालुक्यातील सरकारी आश्रमशाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनींना घरपोच व आश्रमशाळेत बोलावून वितरित केले गेल्याची बाब पुढे आली आहे. मुदतबाह्य टेट्रापॅक विद्यार्थ्यांच्या हातात पडल्याची माहिती पालकांनी श्री. पवार आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर श्री. पवार यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सुगंधी दुधाचा मुदतबाह्य पुरवठा झाला असून, दूध नाशवंत असल्याने पिण्यासाठी योग्य नसल्याने विद्यार्थ्यांना पिण्यासाठी देऊ नये, मुदतबाह्य दुधाचे वाटप झाल्यास मला संपर्क करावा, असे कळविले. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना दूध पिण्यासाठी दिले नाही. दुधाला दुर्गंधी येत असल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत. 

मुदतबाह्य दूध पुरविले जाणार नाही याची जबाबदारी पुरवठादारांची आहे. तरीही टेट्रापॅकचे वाटप करताना कुठल्याही प्रकारची दक्षता घेण्यात आलेली नाही. वैधता संपलेल्या दुधाचा पुरवठा करून विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात टाकत संबंधित अधिकारी आणि व ठेकेदाराचे दुर्लक्ष आणि हलगर्जी आहे. त्यामुळे पुरवठादाराला काळ्या यादीत टाकावे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी विनंती सरकारला केली आहे. 
- नितीन पवार, आमदार, कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघ

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com