esakal | Nashik : ‘टाटा’ प्रोजेक्टच्या एलईडी अंधारावर संशय
sakal

बोलून बातमी शोधा

नाशिक : ‘टाटा’ प्रोजेक्टच्या एलईडी अंधारावर संशय

नाशिक : ‘टाटा’ प्रोजेक्टच्या एलईडी अंधारावर संशय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सोडियम फिटिंग बदलून त्याऐवजी एलईडी फिटिंग बसविण्याचे काम अपुरे असतानाच आता कमी प्रकाशाचे एलईडी दिवे लावण्याबरोबरच रात्री अनेक भागात दिवे पेटविले जात नाहीत. त्यातून बचतीच्या रकमेवर डल्ला मारला जात असल्याचा संशय स्थायी समिती सदस्यांनी घेतला. परंतु ‘टाटा’ सिर्फ नाम काफी है असल्याचा साक्षात्कार काही वेळातच झाल्यानंतर नेमकी किती फिटिंग बसविल्या, रात्री पुरेसा प्रकाश पडतो की नाही, हे तपासण्यासाठी महापालिकेचे भरारी पथक नियुक्त करण्याबरोबरच दिवाळीपूर्वी शिल्लक राहिलेल्या दोन हजार खांबांवर एलईडी फिटिंग बसविण्याच्या सूचना सभापती गणेश गिते यांनी दिल्या.

स्थायी समिती सभेत एलईडी फिटिंगवर जोरदार चर्चा झाली. प्रभाग क्रमांक २५ मध्ये बसविण्यात आलेल्या एलईडी दिव्यांचा पुरेसा प्रकाश पडत नाही. शहरात महामार्गासह अनेक भागांत खांब बसविले, परंतु एलईडी दिवे नाहीत. दिवे असले तरी त्यांचा पुरेसा प्रकाश पडत नाही. त्यातून ज्येष्ठ नागरिकांना रात्री चाचपडत वाट काढावी लागते. अंधार असल्याने चोरट्यांचे फावले असल्याची बाब नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी पटलावर आणताना एलईडी फिटिंगच्या करारासंदर्भात विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र वनमाळी यांच्याकडून माहिती मागविली.

२०१८ मध्ये एलईडी फिटिंगचे काम टाटा प्रोजेक्ट कंपनीला देण्यात आले. ९२ हजार फिटिंगपैकी ९० हजार फिटिंग लागल्या आहेत. उर्वरित दोन हजार फिटिंग लावण्याचे काम सुरू आहे. एलईडी फिटिंग बसविण्याच्या बदल्यात वीज बचतीच्या एकूण रकमेपैकी ६१ टक्के रक्कम टाटा प्रोजेक्टला अदा करण्याचा करार आहे. त्यानुसार आतापर्यंत सुमारे नऊ कोटी रुपये अदा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. वीजबचतीतून टाटा प्रोजेक्ट कंपनीला रक्कम अदा करायची असल्याने चुकीच्या पद्धतीने वीजबचत दाखविली जात असल्याचा आरोप बडगुजर यांनी केला.

हेही वाचा: दिंडोरी तालुक्यात पावसाचा १५ हजार हेक्टरवरील टोमॅटोला फटका

अनेक भागांत एलईडी दिवे असले तरी त्यांचा पुरेसा प्रकाश पडत नाही. बऱ्याच भागात एलईडी बंदावस्थेत असल्याने अशी बचत महापालिकेची फसवणूक करणारी असल्याने महापालिकेने भरारी पथक नियुक्तीच्या सूचना दिल्या. सलीम शेख, मुकेश शहाणे, राहुल दिवे यांनी बडगुजर यांच्या भूमिकेशी सहमती दर्शविली.

टाटा नव्हे व्हेंडरची अडचण

टाटा प्रोजेक्टमार्फत एलईडी फिटिंग बसविण्याचे काम सुरू असले तरी व्हेंडरची देयके विद्युत विभागाने अडकविल्याचा गौप्यस्फोट खुद्द सभापती गिते यांनीच केला. त्यामुळे तातडीने देयके अदा करण्याबरोबरच दिवाळीपूर्वी करारानुसार एलईडी फिटिंग बसवाव्यात व सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

अधिकारी पार्टनर

नाशिक रोड भागात खांब फिटिंगचे काम देताना विद्युत विभागाचे अधिकारी पार्टनर असल्याचा आरोप नगरसेवक मुकेश शहाणे यांनी केला. निविदा प्रक्रियेत पात्र नसताना डी. जे. इलेक्ट्रिकलला काम देण्यात आल्याने त्यासंदर्भात सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

loading image
go to top