
नाशिक : मायदरा, धानोशी, ठोकळवाडी गावांना टॅंकरने पाणीपुरवठा
इगतपुरी (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील मायदरा-धानोशी ठोकळवाडी येथील ग्रामस्थांना गेली अनेक वर्षे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भर उन्हातान्हात दहा ते बारा किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. या गावांसाठी शासनातर्फे टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी ठोकळवाडीतील आदिवासी महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी दिवसरात्र वणवण फिरावे लागत आहे. त्यांना दिलासा मिळावा यासाठी सरपंच पुष्पा बांबळे यांनी इगतपुरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांच्याकडे टॅकरचा प्रस्ताव देत पाठपुरावा केला होता. टॅकरद्वारे पाणीपुरवठा करत येथील ग्रामस्थांची तहान भागवण्यात आली आहे. दरम्यान दरवर्षी होणा-या या पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यात येऊन पाणीप्रश्न कायमचा मार्गी लावण्यात यावा अशी मागणी सरपंच पुष्पा बांबळे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
मायदरा-धानोशी येथील जवळपास साठ सत्तर कुटुंब असलेल्या ठोकळवाडीतील ग्रामस्थ महिलांना दर वर्षी जानेवारी ते जूनच्या शेवटापर्यंत डोक्यावर हंडा घेऊन दूर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. प्रशासनाने गतवर्षी दोन हातपंपही केले, मात्र एकाचे पाणी आटल्याने ठोकळवाडी ग्रामस्थ नंबर लावून पाणी भरतात. दर अर्ध्या तासाला एक हंडाभर पाणी येत असल्याने त्यासाठी तासनतासाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
''दरवर्षी पिण्याच्या पाण्यासाठी दिवसरात्र एकमेव असलेल्या हातपंपावर नंबर लावून वेळ खर्च करून रात्री अपरात्री जीव धोक्यात घालून पाणी भरावे लागते आहे. एक तासात दोन हंडे पाणी मिळत असल्याने इतर सर्व कामे करण्यासाठी वेळ मिळत नाही. या दरवर्षी होणा-या पाणीटंचाईवर शासनाच्या वतीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येऊन पाणीप्रश्न कायमचा सोडविण्यात यावा.'' - पुष्पा बांबळे, सरपंच, मायदरा - धानोशी.