Nashik: स्पेशल चहावाला ‘संजू’चे दुकान बनले अभ्यासिका; देवमामलेदारांच्या नगरीला दांपत्यांचे मातृ-पितृ कार्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik News

Nashik: स्पेशल चहावाला ‘संजू’चे दुकान बनले अभ्यासिका; देवमामलेदारांच्या नगरीला दांपत्यांचे मातृ-पितृ कार्य

सटाणा : घरात अठराविश्व दारिद्र्य, त्यामुळे दहावीचा परीक्षा फॉर्म भरणेही शक्य झाले नाही. शिक्षण थांबले, मग रोजीरोटीसाठी आठवडे बाजारात चहाच्या टपरीवर काम सुरू केले. पुढे स्पेशल चहावाला ‘संजू’ म्हणून आठवडे बाजारातच प्रसिद्ध झाला. अल्पदरात भेळ, वडापाव विक्री सुरू केली.

स्वप्नांच्या वेलमधील फूलच गळलं... वेल खुंटल्याचे दुःख पचवत दुसऱ्यांचे वेल फुलवायचे ध्येय उराशी बाळगत हळूहळू आपल्या कमाईवर संजूने गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य अभ्यासिका सुरू केली. तसेच ज्यांना दोन वेळेचं जेवण नाही, त्यांना जेवण अन्‌ शिक्षणासह औषधोपचारासाठी मदत करण्याचे काम देवमामलेदारांच्या नगरीतील संजय बाबूराव जाधव करीत आहेत.

हेही वाचा: Succes Story : अन्न नव्हते, छत नव्हते, पण आत्मविश्वास होता म्हणून झाले पोलिस

येथील अहिल्याबाई चौकातील संजय जाधव यांचा आई, वडील, तीन भाऊ असा परिवार. पारंपरिक उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. कुटुंबात मोलमजुरी करता करता थोडेफार शिक्षण घेत १९८४-८५ मध्ये संजयने चित्रा सिनेमासमोर हातगाडीवर ‘महालक्ष्मी चहा टपरी-वडापाव’चे दुकान थाटले. तालुक्यातील ठेंगोडा, मुल्हेर, डांगसौंदाणे, लखमापूर या गावांच्या आठवडे बाजारात संजयने चहाची टपरी चालवली.

१९९५-९६ पर्यंत काबाडकष्ट करीत त्याने देवमामलेदार यशवंतराव महाराज ट्रस्ट संकुलात भाडेतत्त्वावर गाळा घेतला. आर्थिक स्त्रोत भक्कम झाल्यानंतर १९९९ मध्ये वाणी गल्लीतील महालक्ष्मी चौकात स्वामी समर्थ पतसंस्थेकडून कर्ज घेऊन ‘लक्ष्मी कृपा’ ही तीनमजली टोलेजंग इमारत विकत घेतली. तेथेच ‘महालक्ष्मी’ या नावाने जेवणाची खानावळ (मेस) सुरू केली.

हेही वाचा: Succes : यश मिळवण्यासाठी या गोष्टी नक्की करा

शहरात गणेशोत्सव, रमजान व इतर सण-उत्सवाच्या बंदोबस्तासाठी येणारे शेकडो पोलिस, गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव दलाच्या जवानांचे ‘महालक्ष्मी मेस’ हे आवडीचे ठिकाण बनले. पत्नी मनीषाबरोबर सुखाचा संसार सुरू असतानाच संजूचा लहान मुलगा राहुल याचे आकस्मित निधन झाले. त्यामुळे सर्व जाधव कुटुंब हादरले.

तेजीत असलेला खानावळीचा व्यवसाय त्यांनी बंद करायचा निर्णय घेतला. फक्त चित्रा सिनेमासमोरील ‘महालक्ष्मी’ भेळ दुकान सुरू ठेवले. दिवंगत मुलगा राहुल याच्या स्मृतिप्रीत्यर्थ संजयने तीनमजली इमारतीत ‘संत शिरोमणी देवमामलेदार मोफत अभ्यासिका व वाचनालय’ सुरू केले. १९९८-९९ मध्ये शहरात अभूतपूर्व भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. संजयचा उच्च विद्याविभूषित मुलगा नीलेश याने समाजातील मागेल त्याला मोफत पाणी पुरवण्याची इच्छा व्यक्त केली.

हेही वाचा: MPSC : स्पर्धा परीक्षेत अखेर ‘महाराष्ट्राचा इतिहास’

संजय व पत्नी मनीषाने आपल्याकडील सर्व दागिने मोडून मिळालेल्या पैशातून त्यांच्या राहत्या घरासमोर अहिल्याबाई पुतळ्याजवळ कूपनलिका खोदून जलपरी बसवली. ते पाणी पुरत नाही हे पाहून शेजारीच विहीर खोदली. त्या विहिरीला भरपूर पाणी लागले. विहीर बांधून संजयने मोफत पाणीपुरवठा सुरू ठेवला. तेथेच मोकाट जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था केली.

संत शिरोमणी देवमामलेदार अभ्यासिकेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना पिण्यासाठी केंटचे पाणी, मुला-मुलींची स्वतंत्र बसण्याची व्यवस्था, प्रत्येकाला स्टडी चेअर, कपाट, शौचालय-बाथरूम, इलेक्ट्रिकल दुचाकी व मोबाईल चार्जिंग पॉइंट दिले आहेत. सर्वच दैनिके, पाक्षिके, मासिके, स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके, संदर्भ ग्रंथ अभ्यासिकेत ठेवली आहेत.

हेही वाचा: Success Story : वडिलांची स्वप्नपूर्ती करत निफाडचा चैतन्य बनला Indigoमघ्ये पायलट!

या वाचनालयाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे कोणीही कुणावर देखरेख ठेवत नाही. स्वतः येणे, हजेरी भरणे व दिवस मावळायच्या आत आपापल्या घरी जाणे. हा येथील अलिखित नियम आहे. सर्व झाडलोट, स्वच्छता करण्याचे काम पत्नी मनीषा करतात. संजय यांचा एकुलता एक मुलगा नीलेश दिल्लीला स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. वडिलांचे स्वप्न साकार करण्याची खूणगाठ ‘नीलेश’ने बांधली आहे.

''मोफत अभ्यासिकेत येऊन ज्ञानार्जन करणाऱ्या खेड्यापाड्यातील गरजू मुला-मुलींच्या चेहऱ्यावरील समाधानात मला सर्व काही मिळाल्याचा भास होतो. कोणत्याही पुरस्कारापेक्षा त्या विद्यार्थ्यांचे समाधान पाहून मला कृतकृत्य झाल्यासारखे वाटते.'' - संजय जाधव, संचालक, संत शिरोमणी देवमामलेदार अभ्यासिका

टॅग्स :Nashikstudent