esakal | नाशिक मनपा निवडणूक : ‘राष्ट्रवादी’कडून ५२८ इच्छुकांची चाचपणी
sakal

बोलून बातमी शोधा

Ncp

नाशिक मनपा निवडणूक : ‘राष्ट्रवादी’कडून ५२८ इच्छुकांची चाचपणी

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाविकास आघाडी होईल किंवा नाही याबाबत स्पष्टता नसली तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कमी कालावधी राहिल्याने तयारीला लागावे. त्याचबरोबर इच्छुकांनी रिव्हर्स कॅलेंडर तयार करून मतदार याद्यांचे वाचन सुरू करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार जयवंत जाधव यांनी मंगळवारी (ता.१४) केले.


जानेवारी महिन्यात महापालिका निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पक्षाच्या कार्यालयात ३१ प्रभागातील इच्छुक उमेदवारांची चाचपणी शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी प्रदेश उपाध्यक्ष नाना महाले, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, माजी आमदार जयवंत जाधव, डॉ. अपूर्व हिरे, निवृत्ती अरिंगळे, महापालिकेचे गटनेते गजानन शेलार, बाळासाहेब कर्डक, कविता कर्डक, मनोहर बोराडे, अंबादास खैरे, गौरव गोवर्धने, दत्ता पाटील, किशोर शिरसाट आदी उपस्थित होते. या वेळी बोलताना माजी आमदार जाधव म्हणाले, महापालिका निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तयारीला सुरवात करण्यात आली आहे. पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बूथ रचनेवर अधिकाधिक भर द्यावा. निवडणुकीसाठी कमी कालावधी राहिला आहे. त्यामुळे त्यादृष्टीने नियोजन करून तयारी करावी. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये बिनबुडाचे आरोप करण्यात आले होते. मात्र, नुकताच न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल देऊन न्याय दिला आहे. यातून संविधानाचा विजय झाला असून, न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. शहरातील राजकीय परिस्थिती वेगळी झाली आहे. जनसामान्यांमध्ये पक्षाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्याचा फायदा महापालिका निवडणुकीला होणार आहे.

हेही वाचा: गुड न्यूज : पाणी संकट टळले! नगर, नाशिकची धरणे भरली

राष्ट्रवादी काँग्रेसचे एकला चालो रे

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी होणार की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे कमी कालावधी असल्याने तयारीचा वेग वाढवावा लागणार आहे. सर्व इच्छुक उमेदवारांनी तळागाळात पोचावे, इच्छुकांनी रिव्हर्स कॅलेंडर तयार करावे, मतदार याद्यांचे वाचन करावे, दुबार नावे कमी करून नवीन मतदार नोंदणी करावी, असे आवाहन श्री. जाधव यांनी केले. आगामी निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी मतदार यादीचे दुरुस्ती प्रक्रिया इच्छुकांनी राबवाव्यात, उमेदवारी कोणाला मिळेल याची शाश्वती देता येणार नाही. परंतु, जनमानसात इच्छुकांनी स्वतःचे स्थान निर्माण करावे जेणेकरून पक्ष स्वतःहून उमेदवारी देईल, अशी अपेक्षा श्री. जाधव यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: गोदेची पातळी वाढली! गंगापूर, दारणा धरण समूहातून विसर्ग

सहा विभागात दौरा

राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहरातील सहा विभागात दौरा करून प्रभाग व वार्डनिहाय इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. महापालिकेच्या १२२ जागांकरिता ५२८ उमेदवारांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. यासह अन्य इच्छुकांना माहिती नसल्याने त्यांनी फोनद्वारे संपर्क साधला आहे. त्यांचीही चाचपणी करण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिली.

loading image
go to top