सकाळ’चे शतशः आभार! खरशेतमध्ये पुलाचे पूजन करत जयघोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सकाळ’चे शतशः आभार! खरशेतमध्ये पुलाचे पूजन करत जयघोष
सकाळ’चे शतशः आभार! खरशेतमध्ये पुलाचे पूजन करत जयघोष

सकाळ’चे शतशः आभार! खरशेतमध्ये पुलाचे पूजन करत जयघोष

नाशिक : आदिवासी बांधवांच्या जगण्यातील दुःखांकडे कानाडोळा करणारे लोकप्रतिनिधी अन्‌ आदिवासींच्या जीवघेण्या कसरतींबद्दल अनभिज्ञ असलेले प्रशासन, अशा विचित्र प्रश्‍नांचा गुंता खरशेत (ता. त्र्यंबकेश्‍वर) ग्रामपंचायतीअंतर्गतच्या पाड्यांवरील कुटुंबांपुढे उभा ठाकला होता. ‘सकाळ’ने ही वेदना वृत्तांमधून मांडत, हा प्रश्‍न सोडविण्यासाठी पाठपुरावा केला. अखेर ३० फूट खोल तास नदीवर जिल्हा परिषदेने लोखंडी पूल उभारला. इथल्या आदिवासी भगिनींनी पिण्याच्या पाण्याचे डोईवरून हंडे घेत या पुलावरून ये-जा केली. या भगिनींच्या जोडीला आदिवासी बांधवांनी ‘सकाळ’चे शतशः आभार मानले.

हेही वाचा: Mhada : म्हाडा काढणार 4 हजार घरांसाठी लॉटरी, जुलै महिन्यात सोडत निघण्याची शक्यता|

पाड्यावरील कुटुंबांमध्ये आज उत्सवी वातावरण होते. आदिवासी बांधवांनी लोखंडी पुलाचे पूजन केले. त्या वेळी ‘बजरंग बली की जय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असा जयघोष करण्यात आला. दरम्यान, तास नदीवरील बल्ल्यांवरून पिण्याच्या पाण्याचे हंडे घेऊन रोज जीवघेणी कसरत करावी लागत असल्याचे छायाचित्र अन्‌ वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होताच, प्रशासन खडबडून जागे झाले. एरव्ही कुणीही अधिकारी पाड्याकडे फिरत नसायचे. मात्र अधिकारी-कर्मचारी पाड्यावर पोचले. पहिल्यांदा लोखंडी पूल करण्यासाठी मोजमाप घेत असताना दुर्घटना घडून आणखी प्रश्‍न चिघळू नये म्हणून बल्ल्या हटविल्या गेल्या.

हेही वाचा: भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन मागे घेणार का? आज निर्णय

बल्ल्या हटविल्यामुळे इथल्या आदिवासींना उड्या मारून एका काठावरून दुसरा काठ गाठावा लागत असताना भगिनींची रानोमाळ पाण्यासाठी भटकंती सुरू झाली. ही समस्या ‘सकाळ’मधून मांडली गेली अन्‌ त्याची दखल पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यापासून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्यापर्यंत सरकारदरबारी घेतली गेली.

एवढं होऊनही सरकारी बैठकांमधून आदिवासींचे लोकप्रतिनिधी आणि उच्च पदस्थ अधिकारी आदिवासींच्या खऱ्या दुःखाबद्दल नेमकेपणाने बोलायला तयार नव्हते. अखेर या भागात पोचलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक आदिवासींची भेट घेतली. मग ठेकेदाराला गाठून त्याच्या हातावर सव्वालाख दिल्याची बाब सोशल मीडियातून व्हायरल झाली. स्थानिक यंत्रणेने हे वास्तव जिल्हास्तरावर अधिकाऱ्यांपर्यंत पोचवण्याची तसदी घेतली नसल्याची बाब दडून राहिली नाही. त्यामुळे एक प्रश्‍न अजूनही अनुत्तरीत राहतोय, तो म्हणजे, शिवसेना कार्यकर्त्यांची ही रोख मदत नेमक्या कोणत्या कामासाठी वापरली जाणार? एकाच कामासाठी रोख रक्कम आणि ग्राम निधी, पेसा निधी वापरला जाणार नाही, याची काळजी स्वाभाविकपणे आता जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला घ्यावी लागणार आहे.

हेही वाचा: दुसऱ्या डोसपासून नऊ महिने झाल्यास बूस्टर डोस

प्रश्‍न सुटतील असा विश्‍वास

सजविलेल्या खिडकीतून खूप काही दिसतं. पण घरात अन्‌ माणसाच्या मनात अंधार होता. हे आम्ही भोगत होतो. समस्यांना तोंड देत होतो. ही समस्या ‘सकाळ माध्यम समूहा’मुळे सुटत आहे. त्याचा आनंद आहे. आमचे आणखी प्रश्‍न आहेत. तेही सुटतील असा विश्‍वास वाटतो, अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवासी अंबादास गांगोडे यांनी मांडली. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना आमच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्याच्या धूसरशा इच्छाशक्तीचा कवडसा आम्हाला दिसत नव्हता. पण, आता तशी स्थिती राहिली नसल्याचा आशावाद त्यांनी मांडलाय.

आदिवासी बांधवांच्या आणखी मागण्या

  • - सिमेंटचा कायमस्वरूपी पूल व्हावा

  • - सावरपाडा, शेंद्रीपाडा असा पक्का रस्ता व्हावा

  • - मुलांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी रेंज मिळावी

  • - सुविधा ः प्रशस्त वाहन पार्किंग

  • - आरोग्याच्या प्रश्‍नांचे निराकारण व्हावे

  • - पिण्याच्या पाण्यासाठी शाश्‍वत योजना राबवावी

  • - घरामध्ये वीज मिळावी

  • - पोषण आहार नियमितपणे मिळावा

  • - रेशन दुकानातील धान्य नियमित व पुरेसे मिळावे

  • - निसर्गसौंदर्यामुळे पर्यटन विकास होत रोजगार उपलब्ध करून द्यावा

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashik
loading image
go to top