Nashik : प्रभागरचनेचा आराखडा २९ ला होणार सादर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nashik muncipal corporation
प्रभागरचनेचा आराखडा २९ ला होणार सादर

प्रभागरचनेचा आराखडा २९ ला होणार सादर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी कच्चा प्रभागरचनेचा आराखडा अंतिम टप्प्यात आला असून, सूचनेवरून राज्य निवडणूक आयोगाकडे तो २९ नोव्हेंबरला सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्रिसदस्यीय रचनेप्रमाणे तीन सदस्यांचे ४३, तर चार सदस्यांचा एक असे एकूण ४४ प्रभाग तयार होणार आहेत.

फेब्रुवारीत नाशिकसह राज्यातील बावीस महापालिकांच्या निवडणुका होत आहे. त्यासाठी कच्ची प्रभागरचना तयार करण्याचे काम सुरू आहे. डिसेंबर २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकारने एकसदस्यीय प्रभागरचनेचा कायदा केला होता. परंतु, राज्य मंत्रिमंडळाने निर्णय बदलत तीनसदस्यीय प्रभागरचना निश्चित केली. या प्रभागरचनेला राज्यपालांनी संमती दिल्यानंतर महापालिकेच्या निवडणूक विभागाने कच्ची प्रभागरचना नव्याने करीत १२२ नगरसेवकांच्या संख्येनुसार तीन सदस्यांचे ४०, तर दोन सदस्यांचा एक असे एकूण ४१ प्रभाग निश्‍चित केले. परंतु, राज्य मंत्रिमंडळाने अचानक २०२१ मधील वाढीव लोकसंख्येचा विचार करून सदस्यसंख्या वाढविली. त्यामुळे नाशिक महापालिकेत नगरसेवक संख्येत अकराने वाढ झाली. वाढीव ११ नगरसेवकांच्या संख्येनुसार आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

राज्य निवडणूक आयोगाने ३० नोव्हेंबरपर्यंत प्रभागरचनेचा कच्चा आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या. प्रगणक गट, प्रभाग दर्शविणाऱ्या केएमएल फाइल, सर्व प्रभाग, त्यामध्ये समाविष्ट प्रगणक गट व लोकसंख्येचे विवरण असलेला पेन ड्राइव्ह सील करून खास दुतामार्फत गोपनीयरीत्या पाठवण्याचे आदेश दिले. त्यानुसार २९ नोव्हेंबरला प्रभागरचनेचा कच्चा आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर केला जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

हेही वाचा: हिवाळी अधिवेशनाच्या तारखेवरुन गोंधळ! उपसचिवांचं पत्रक व्हायरल

कामकाज नियमित

त्रिसदस्यीय प्रभागरचना व नगरसेवकांची संख्या वाढविल्याने त्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगासह राज्य शासनाला म्हणणे मांडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याचिका दाखल करण्यात आली असली तरी न्यायालयाने प्रभाग रचनेसंदर्भात कुठले आदेश दिले नाहीत. त्यामुळे प्रभागरचनेचे कामकाज नियमितपणे सुरूच राहणार आहे.

अनुसूचित जाती-जमातीच्या जागा वाढणार

२०११ मधील जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १४ लाख ८६ हजार ५३ आहे. यात अनुसूचित जाती दोन लाख १४ हजार १२०, तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या एक लाख सात हजार ४५६ आहे. अकरा वाढीव जागांचा विचार करता अनुसूचित जाती व जमाती संवर्गाची प्रत्येकी एक जागा वाढण्याची शक्यता आहे. नगरसेवकांची संख्या वाढल्याने साधारण ३२ हजार लोकसंख्येचा एक प्रभाग होऊ शकतो.

loading image
go to top