
घरात राहण्यासाठी जागा नाही, होम आयसोलेट कुठून होणार ?
नाशिक : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णालयांमध्ये जागा नाही, त्यामुळे ८४ टक्के कोरोनाबाधितांचे होम आयसोलेशन करण्यात आल्याचा दावा असला तरी जुने नाशिक, सिडको, तसेच झोपडपट्ट्यांमध्ये राहण्यासाठी जागा नाही, तेथे कसले आले होम आयसोलेशन. घरात जागा नसल्याने नाईलाजाने बाहेर फिरणारे कोरोनाबाधित सुपर स्प्रेडर्स ठरत असल्याची बाब ‘सकाळ’च्या पाहणीतून समोर आली आहे.
होम आयसोलेशन खरंच पाळतात का ?
नाशिक शहरात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या एक लाख ८२ हजारांच्या घरात पोचली आहे. कोरोना संसर्ग वाढीचा वेग लक्षात घेता एप्रिलअखेरपर्यंत दोन लाखांचा आकडा पार होईल, असे दिसते. सध्या २७ हजार ७९७ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत, असे महापालिकेची आकडेवारी सांगते. त्यातील ८४ टक्के लोकांवर घरीच म्हणजेच होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आल्याचा दावा महापालिकेच्या वतीने करण्यात आला आहे. होम आयसोलेशन करताना रुग्णाला स्वतंत्र खोली व स्वतंत्र बाथरूमची व्यवस्था असणे गरजेचे आहे. परंतु ८४ टक्के होम आयसोलेशनमध्ये असलेल्या किती लोकांना अशा प्रकारच्या सुविधा आहे, याचा विचार महापालिकेने न करता एचआरसीटी, ऑक्सिजन लेव्हल नियंत्रणात असलेल्या लोकांना होम आयसोलेशन केले आहे. होम आयसोलेशनमधील किती रुग्णांना राहण्यासाठी स्वतंत्र जागा आहे, याचा अभ्यास ‘सकाळ’च्या वतीने करण्यात आला असता, त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हेही वाचा: कोविड सेंटरमध्ये 'नो स्टंटबाजी'; एकाच पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये पेटला वाद
जुने नाशिक ठरतेय कोरोना स्प्रेडर्स
पूर्व विभागात एकूण ८३ हजार ७४९ मिळकती आहेत. त्यातील जुने नाशिक, भद्रकाली भागात ८० टक्के मिळकती असून, एकूण दोन लाख ३६ हजार ७५५ लोकसंख्येपैकी ७५ टक्के लोकसंख्या या भागात सामावलेली आहे. जुने वाड्यांमुळे घरांची घनता या भागात जास्त आहे. एका चौरस किलोमीटरला सुमारे सहा हजार लोकसंख्या सामावली आहे. ५७ टक्के लोक सार्वजनिक शौचालयांचा वापर करतात. एक कुटुंब चार ते पाच लोकांचे आहे. एक ते दोन खोल्यांच्या घरात कोरोनाबाधित रुग्णाला तेही पंधरा दिवस स्वतंत्रपणे ठेवता येणे शक्य नाही. त्यामुळे घराबाहेर राहणे हाच एकमेव पर्याय असल्याने या भागातील कोरोना रुग्ण सुपर स्प्रेडर्स ठरत आहेत.
धोकादायक झोपडपट्ट्या
शहरात १६७ झोपडपट्ट्या असून, यात एक लाख ९६ हजार ६०५ लोकसंख्या आहे. लो रिस्क कोरोनाबाधिताना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्याच्या सूचना आहेत. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांचे आधीच घराचे वांदे, त्यात होम आयसोलेशनच्या सूचना असल्या तरी घराबाहेर राहण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे झोपडपट्ट्यांमधील होम आयसोलेशनमधील लोक कोरोना स्प्रेडर्स ठरताय.
...हे प्रभाग धोकेदायक
पंचवटी विभागात प्रभाग क्रमांक चारची लोकसंख्या ४६ हजार ३०५ आहे. या प्रभागात फुलेनगर झोपडपट्टी असून, फुलेनगरमध्येही अनेक उपनगरे आहेत. एकूण लोकसंख्येपैकी पन्नास टक्के लोकसंख्या झोपडपट्टीमध्ये वास्तव्याला आहे. प्रभाग सहामध्ये रामवाडी परिसर, सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक अकरा मध्ये ४४ हजार ४०१ पैकी जवळपास ८० टक्के लोकसंख्या झोपडपट्टी व गावठाणात वास्तव्याला आहे. प्रभाग बारामध्ये शरणपूर गावठाण, सर्वाधिक घराला घर लागून असलेले व सर्वाधिक दीड लाख लोकसंख्या असलेल्या प्रभाग बारा ते चौदामध्ये कोरोना स्प्रेडर्स धोकेदायकरितीने वावरताना दिसत आहेत. प्रभाग सोळामध्ये ८० भाग झोपडपट्टीचा आहे. प्रभाग १८ मध्ये उपनगर कॅनॉल ही सर्वांत मोठी झोपडपट्टी आहे. सिडकोतील प्रभाग क्रमांक २४, २५, २७, २९ मध्ये घरांची घनता अधिक असल्याने हे प्रभाग कोरोना स्प्रेडर्स ठरण्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा: लेकाच्या डोक्यावर अक्षता टाकून कृषिमंत्री लगेच ऑन फिल्ड!
Web Title: The Problem Of Slums Area During Covid Situation In Nashik Nashik Marathi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..