esakal | तुला गुन्हेगारीमुक्त करतो, पण ‘खंब्या’ची सोय कर..! नाशिकमधील प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

 liquor

तुला गुन्हेगारीमुक्त करतो, पण ‘खंब्या’ची सोय कर..!

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : एकीकडे नाशिकचे पोलिस आयुक्त हे गुन्हेगार सुधार योजनेंतर्गत गुन्हेगारांना सुधारण्याचे महत्तम कार्य करत असताना दुसरीकडे अशा प्रकारच्या गुन्हेगारांकडून बंधपत्राच्या मोबदल्यात ‘खंब्या’ची मागणी कर्मचारी करत असल्याची धक्कादायक बाब चर्चिली जात आहे. आता या गुन्हेगारांबरोबर अशा प्रकारे पोलिस खात्याला बदनाम करणाऱ्या काही पोलिसांनादेखील सुधारण्याची गरज असल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये होत आहे. (There is talk of police personnel demanding alcohol from criminals)अनेक वर्षांपासून गुन्हेगारी जगताला रामराम ठोकून चांगले जीवन जगू इच्छिणाऱ्या व गृहस्थी करणाऱ्या व्यक्तींना गुन्हेगारीच्या पाशातून कायमची मुक्तता मिळण्यासाठी पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी गुन्हेगार सुधार योजना प्रत्यक्षात अमलात आणली. या योजनेमुळे त्यांचे राज्यभर नावदेखील झाले. अनेक वर्षांपासून कुठल्याही प्रकारे गुन्हेगारी क्षेत्रात ढुंकूनही न बघणाऱ्या व्यक्तींना, त्यांच्या कुटुंबीयांना, मुलाबाळांना व आई-वडिलांना खऱ्या अर्थाने मनापासून समाधान लाभले. गुन्हेगारीचा हा डाग कायमस्वरूपी मिटल्याने त्यांच्या मित्रपरिवारानेदेखील सुटकेचा निःश्वास सोडत उपक्रमाबाबत वाहवा केली; परंतु एकीकडे आयुक्त महोदय आपल्या कार्याचा ठसा विधायक उपक्रमातून उमटवत असताना दुसरीकडे मात्र नेहमीच चिरीमिरी घेण्याची सवय असलेले काही कर्मचारी सुधारण्याच्या स्थितीत दिसत नसल्याची खंत व्यक्त होताना दिसून येत आहे.

हेही वाचा: माझी वसुंधरा अभियान : नाशिक विभागाची १४ कोटी ५० लाखांची भागीदारी

गुन्हेगार सुधार योजनेंतर्गत सध्या अशा गुन्हेगारांची यादी प्रत्येक पोलिस ठाण्यांतर्गत करण्यात आली आहे. त्या गुन्हेगारांकडून बंधपत्र लिहून त्यांची गुन्हेगारीच्या यादीतून कायमची सुटका करण्यात येत आहे; परंतु या बंधपत्राच्या मोबदल्यात अंबड ठाण्यातील काही ठराविक पोलिस कर्मचारी वेगवेगळ्या स्वरूपाची मागणी करत आहेत. त्यांपैकी सर्वाधिक मागणी म्हणजे एका खंब्यासाठी होत असल्याची चर्चा आहे. संबंधित व्यक्तीदेखील गुन्ह्यातून कायमची सुटका होत असल्याने राजीखुशीने तो खंबा आणून देत असल्याचे प्रत्यक्ष निदर्शनास येत आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त महोदयांनी आता गुन्हेगारांबरोबर प्रत्येक पोलिस ठाण्यातील अशा प्रकारची वृत्ती बाळगून असणाऱ्या काही पोलिसांनादेखील खऱ्या अर्थाने ‘पोलिस सुधार योजने’अंतर्गत सुधारण्याची गरज असल्याचे मत नागरिक मांडत आहेत.

हेही वाचा: नाशिकमध्ये विवाहात मास्क, सॅनिटायझरसोबत थर्मामीटर सक्तीचे

loading image