
सिन्नरला पक्षांची घरटी हटवण्याचे काम सुरू असताना हजारो पक्षांचा बळी
सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर बस स्थानक समोरील पंचवटी मोटेल्स या चांडक उद्योग समूहाच्या हॉटेलच्या आवारात असलेल्या चिंचेच्या झाडावरील पक्षांची घरटी हटवण्याचे काम सुरू असताना हजारो पक्षांचा बळी गेला आहे. असंख्य अंडी खाली पडून फुटल्याने त्यातून बाहेर पडलेल्या अनेक नवजात पक्ष्यांचा देखील तडफडून मृत्यू झाला. (Thousands of birds were killed during removal of bird nests at chandak hotel tree in Sinnar Nashik Latest Marathi News)
पानकावळे व बगळ्यांची या झाडावर मोठ्या प्रमाणात वस्ती असून या पक्षांमुळे हॉटेलच्या आवारात घाण होत असल्याने व ग्राहकांच्या वाहनांवर ही घाण पडून तक्रारी वाढत असल्याने सदर पक्षांची घरटी हटवण्याचे काम सुरू असल्याची चर्चा आहे.
मात्र हॉटेलमधील काही कर्मचाऱ्यांकडून चिंचेच्या झाडाची खराब व काळी पडलेली फळे काढण्याचे काम करण्यात येत असल्याचे सांगितले जात होते. वन विभागाकडून देखील यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र , या प्रकाराची चर्चा झाल्यावर सिन्नर वनविभागाची टीम हॉटेल परिसरात दाखल झाली असून मृत पावलेल्या पक्षांची मोजदाद सुरू आहे.