esakal | त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे मातब्बरांच्या स्वप्नांना सुरुंग!
sakal

बोलून बातमी शोधा

three-member ward system in the municipal corporation election

त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे मातब्बरांच्या स्वप्नांना सुरुंग!

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : राज्य शासनाने मुंबई वगळता राज्यातील उर्वरित महापालिका निवडणुकीसाठी त्रिसदस्यीय प्रभागरचनेचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाचे शहरातील बहुसंख्य राजकीय पक्षांच्या नगरसेवकांनी स्वागत केले आहे. तथापि, एकसदस्यीय प्रभाग रचना गृहीत धरून अर्थकारणाच्या जोरावर नगरसेवक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अपक्ष व आर्थिकदृष्ट्या मातब्बरांच्या स्वप्नांना यामुळे सुरुंग लागणार आहे.

त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे निवडणुकीत प्रामुख्याने राजकीय पक्षांचा बोलबाला असून, यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाने २५ ऑगस्टला एकसदस्यीय प्रारूप प्रभाग (वॉर्ड) रचना करण्याची सूचना केली होती. येथील महापालिकेची निवडणूक मे २०२२ मध्ये होण्याची शक्यता आहे. प्रभागरचनेसाठी २०११ ची जनगणना लक्षात घेऊन मतदारसंख्या निश्‍चित केली जाणार असल्याने नगरसेवकांची संख्या ‘जैसे थे’ ८४ असेल. यापूर्वी चारसदस्यीय प्रभागरचना असल्याने २१ प्रभाग होते. त्रिसदस्यीय प्रभागरचनेमुळे मात्र प्रभाग संख्येत वाढ होणार आहे. नव्या रचनेमुळे महापालिकेत २८ प्रभाग असण्याची शक्यता आहे.


येथील राजकीय पक्षांनी गेल्या वर्षापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली होती. बहुसदस्यीय प्रभागरचनेमुळे राजकीय पक्षांच्या सभा, समारंभ व कार्यक्रमांना जोम येणार आहे. विद्यमान बहुसंख्य नगरसेवक चारसदस्यीय प्रभाग रचनेत विजयी झाले असल्याने त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तीनसदस्यीय रचनेत काही प्रभागात एक महिला, दोन पुरुष, तर काही प्रभागांत दोन महिला, एक पुरुष अशी स्थिती असेल. यामुळे राजकीय पक्षांची सोय होतानाच एकाच प्रभागातून बहुसंख्य इच्छुक असलेल्या उमेदवारांना संधी मिळणार आहे. बहुसदस्यीय प्रभागरचनेत नगरसेवकांवर जबाबदारी निश्‍चित करता येत नसल्याने नगरसेवक एकमेकांकडे बोट दाखवून मोकळे होतात, अशी भावना मतदारांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: राज ठाकरेंचा शाखा प्रमुखांना इशारा; म्हणाले, बोलावलं त्यांनीच…

बहुसदस्यीय प्रभागरचनेचा मतदारांना फारसा चांगला अनुभव नाही. राज्य निवडणूक आयोगाच्या यापूर्वीच्या सूचनेनुसार एकसदस्यीय प्रभागरचना करण्यासंदर्भात महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. मात्र, त्याचवेळी द्विसदस्यीय प्रभागरचना करण्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर वॉर्डरचनेच्या कामात फारशी प्रगती झालेली नाही. आता समितीदेखील त्रिसदस्यीय प्रभागरचनेसाठी कार्यवाही करेल.

महापालिकेत काँग्रेस व शिवसेना या मित्रपक्षांची सत्ता आहे. शहरात राष्ट्रवादी काँग्रेस व ‘एमआयएम’ने निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर सभा, प्रचारफेऱ्यांचा धूमधडाका सुरू केला आहे. त्याचवेळी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीदेखील झडू लागल्या आहेत. महापालिकेतील सत्तारुढ गटाला विरोधकांनी रस्त्याच्या दुरवस्थेवरून लक्ष्य केले आहे. याउलट या पाच वर्षांतच नव्हे, तर या पूर्वीदेखील शहरात जी काही विकासकामे झाली ती मनपातील सत्तारुढ काँग्रेसनेच केल्याचा दावा काँग्रेस व मित्रपक्ष करीत आहे.

हेही वाचा: जरा थांबा, कांदा हसविणार आहे; शेतकऱ्यांना जाणकारांचे आवाहनमनसे नशीब आजमावण्याची शक्यता

शहरातील मुस्लिमबहुल असलेल्या पूर्व भागात प्रामुख्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस युतीविरोधात एमआयएम, जनता दल याविरोधी पक्षांची महागठबंधन आघाडी अशी लढत होईल. पश्‍चिम भागात शिवसेना-भाजपमध्ये प्रामुख्याने लढत होईल. मनसे या निवडणुकीत नशीब आजमावण्याचा प्रयत्न करेल. आगामी निवडणूक महापालिकेची स्थापनेनंतरची पाचवी निवडणूक आहे.

हेही वाचा: वृद्ध शेतकऱ्याची कुऱ्हाडीने वार करुन हत्या, परिसरात खळबळ

loading image
go to top