
Nashik Crime News : पिस्तुलीचा धाक दाखवून लुट करणारे तिघे जेरबंद; संशयितांमध्ये दोघे अल्पवयीन
नाशिक : कंपनीतून काम आटोपून घराकडे परतताना पंचवटीतील जे.के. टायर दुकानासमोर पल्सर दुचाकीवरून आलेल्या तिघांपैकी दोघांनी एकावर पिस्तुली ताणल्या आणि त्याच्याकडील लॅपटॉप बॅग हिसकावून पोबारा केल्याची घटना मंगळवारी (ता. २१) रात्री घडली.
घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी बुधवारी (ता. २२) पहाटेच्या सुमारास संशयित तिघांना अवघ्या काही तासात शिताफीने जेरबंद केले. संशयित तिघेही परप्रांतिय असून यातील दोघे अल्पवयीन आहेत. (Three who robbed at gunpoint, jailed Two of suspects are minors Nashik Crime News)

जप्त वस्तू
मुकेश चित्ते (रा. म्हसरुळ, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, ते गेल्या मंगळवारी (ता. २१) ते अंबड एमआयडीसीतील कंपनीचे काम आटोपून दुचाकीवरून घरी परतत होते. पंचवटीतील तपोवन क्रॉसिंगजवळील जे.के. टायर दुकानासमोर असताना पाठीमागून पल्सर दुचाकीवरून तिघे संशयित आले.
त्यांच्यातील पाठीमागे बसलेल्या दोघांनी चित्ते यांच्यावर पिस्तुल रोखले आणि दुचाकी आडवी लावून त्यांना थांबविले. त्यांच्याकडे पैशांची मागणी केली असता, त्यांनी पैसे नसल्याचे सांगितले. संशयितांनी चित्ते यांच्याकडील ४० हजारांचा लॅपटॉप बॅगसह हिसकावून घेत पोबारा केला. याप्रकरणी पंचवटी पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरील गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पंचवटी पोलीसांनी तात्काळ गुन्हेशोध पथकाला खबर दिली. त्याप्रमाणे पंचवटी परिसरात संशयितांचा शोध सुरू असताना, बुधवारी (ता. २२) पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास संशयित तिघे पल्सरवर हिरावाडी रोडवरील मीनाताई ठाकरे स्टेडियमजवळ आढळून आले.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
रात्रगस्ती पथकाच्या कर्मचार्यांनी त्यांना हटकले असता ते पळून जाऊ लागले. त्यावेळी पाठलाग करून तिघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुल, चोरीचा लॅपटॉप, चाकू, चार मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली पल्सर दुचाकी असा १ लाख ५१ हजार ५०० रुपयांचा ऐवज हस्तगत केला.
अवनेश उर्फ आयुष मथुरा केवट (२२, रा. इंदौर, मध्यप्रदेश), व दोघे अल्पवयीन मुलांना (दोघे रा. जौनपूर, उत्तरप्रदेश) ताब्यात घेतले आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, गुन्हेशोध पथकाचे पोलीस निरीक्षक रणजित नलावडे, सहायक निरीक्षक सत्यवान यांच्या पथकाने बजावली.
तीन गुन्ह्यांची उकल
तिघा संशयितांच्या चौकशीतून तीन गुन्ह्यांची उकल झाली आहे. यात नाशिक शहरातील पंचवटी व अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबरी चोरी तर, नवी मुंबईतील तळोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली आहे.