प्रतिष्ठानला आता दर वर्षी दहा लाखांचे अनुदान
मराठा भाषा विभागाचा निर्णय; संस्थेला मिळणार पाठबळ
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १४ : नाशिकचे सांस्कृतिक वैभव असलेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानला राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाकडून दर वर्षी दहा लाखांचे अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. १४) झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, यामुळे नाशिकच्या साहित्य आणि सांस्कृतिक परंपरेला मोठे पाठबळ मिळणार आहे.
मराठी भाषा विभागाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या ‘ग्रंथोत्तेजक संस्था अनुदान’ योजनेंतर्गत आर्थिक वर्ष २०२६-२७ पासून हे अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. २६ मार्च १९९० मध्ये कुसुमाग्रज प्रतिष्ठानची स्थापना झाली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिष्ठान आपल्या स्तरावर देणग्या आणि लोकसहभागातून काम सुरू होते. आता मात्र सरकारी अनुदानामुळे या कामात अधिक सुसूत्रता आणि विस्तार येणे शक्य होणार आहे. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून संस्थेच्या वतीने अनुदान मिळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात होता. शासन निर्णयानुसार, हे अनुदान महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नियमित योजनेतून दिले जाईल. २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात याची तरतूद केली जाणार असून, त्यानंतर दर वर्षी हा निधी संस्थेला प्राप्त होईल. मराठी भाषेचे जतन, संवर्धन आणि वाचन संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माेठे योगदान आहे, याची दखल घेत सरकारने निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नाशिकच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे. कुसुमाग्रजांच्या स्मृती जतन करण्याबरोबर नवीन लेखकांना व्यासपीठ मिळवून देणे आणि दर्जेदार साहित्याचा प्रसार करणे या कामांना आता गती मिळणार आहे.
साहित्यिक उपक्रमांना मिळणार बळ
मराठी भाषा विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना मोठी आर्थिक मदत मिळणार आहे. प्रतिष्ठानतर्फे एक वर्षाआड दिला जाणारा मानाचा ‘जनस्थान’ पुरस्कार, ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार आणि जगभर विस्तारलेला ‘ग्रंथ तुमच्या दारी’ उपक्रमांसाठी हे अनुदान मैलाचा दगड ठरणार आहे.
कोट
संस्थेच्या वतीने दर वर्षी साहित्य क्षेत्रातील मोठे कार्यक्रम घेतले जातात, तर आपण अनुदान का मागू नये म्हणून गेल्या दोन वर्षापासून संस्थेचा शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. या निर्णयामुळे संस्थेला पाठबळ मिळणार आहे.
- प्रकाश होळकर,
उपाध्यक्ष, कुसुमाग्रज प्रतिष्ठान
कुसुमाग्रज प्रतिष्ठान जुनी संस्था आहे. तिला शासनाचे अनुदान मिळावे म्हणून गेल्या वर्षी साहित्य आणि संस्कृती मंडळाकडे प्रस्ताव मांडला होता. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यामुळे कुसुमाग्रजांवर प्रेम करणाऱ्यांसाठी हा आनंदाचा क्षण आहे.
- डॉ. सिसिलिया कार्व्हलो,
विश्वस्थ, कुसुमाग्रज प्रतिष्ठान