NSK26H19267
क्रिकेटपटू रवींद्र जडेजाबरोबर समीक्षा मुंदडा.
राजस्थान रॉयल्सची
गुलाबी जर्सी बनविली समीक्षाने
---
एकोणीसवर्षीय डिझायनरचे कौशल्य पोहोचले राष्ट्रीय स्तरावर
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १५ ः सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)मध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेत सहभागी राजस्थान रॉयल्स संघाचे नाशिकशी नाते जोडले गेले. गेल्या शनिवारी (ता. ९) झालेल्या गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघ आकर्षक गुलाबी जर्सीमध्ये झळकला. ही जर्सी नाशिकच्या १९ वर्षीय समीक्षा मुंदडा हिने डिझाइन केली आहे.
राजस्थान रॉयल्स संघाच्या ‘हुनाआरआर मॅच कॉन्टेस्ट’ स्पर्धेत साडेआठ हजारांहून अधिक प्रवेशिकांमधून समीक्षाने डिझाइन केलेली जर्सी निवडली गेली. संपूर्ण राजस्थान रॉयल्स संघ या खास गुलाबी जर्सीमध्ये मैदानात उतरला. हा सामना ‘रॉयल्स’च्या तिसऱ्या वर्षाच्या ‘पिंक प्रॉमिस मॅच’चे प्रतीक होता. राजस्थान रॉयल्स फाउंडेशनच्या माध्यमातून राजस्थानमध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील परिवर्तनाला पाठिंबा देण्यासाठी हा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमात सामाजिक बांधिलकीही सामील आहे. सामन्यादरम्यान मारल्या गेलेल्या प्रत्येक षटकारामागे, राजस्थानमधील सांबर या ऐतिहासिक शहरातील सहा घरांमध्ये सौरऊर्जेचा वापर करून विद्युतीकरण केले जाईल. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची विद्यार्थी असलेल्या समीक्षाला लहानपणापासून डिझाइन करण्यात रस आहे. क्रिकेट खेळणाऱ्या नेहमी पोस्टर्स तयार करणाऱ्या समीक्षाच्या पहिल्याच जर्सी डिझाइनला हे जोरदार यश मिळाले. ही या खास गुलाबी जर्सीमागील प्रेरणादायी कहाणी आहे.
नामांकित क्रिकेटपटू यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, रवींद्र जडेजा व रियान पराग यांच्या राजस्थान रॉयल्स संघाशी या पद्धतीने जोडली गेल्याबद्दल समीक्षाने समाधान व्यक्त केले. तिने व्यक्त केलेल्या इच्छेनुसार ही गुलाबी-पिंक प्रॉमिस जर्सी रवींद्र जडेजाला सुपूर्द करण्यात आली.