ड्रग्स तस्करीत संशयितांचे अर्ज दाखल
कारागृहातील तौसिफचा जामीन अर्ज; फरारी भिस्तीची ‘अटकपूर्व’साठी धाव
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.२२ : कृषी उत्पन्न बाजार समिती जवळून ताब्यात घेतलेल्या कारमधून ड्रग्ज मिळून आले होते. ड्रग्स विक्री प्रकरणात गुन्हेशाखेने चौघांना अटक केली. तर त्यांचे दोन साथीदार ड्रग्ज पेडलर अद्याप फरार आहेत. त्यापैकी फरारी संशयीत इम्रान ऊर्फ इम्मा हसन हुसेन भिस्ती (रा. शाहूनगर) याच्यातर्फे अटकपूर्व जामिनासाठी तर कारागृहातील तौसिफ सय्यद आरिफ याने जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. दोघांच्या अर्जावर तपास यंत्रणेला दोन दिवसांत (ता.२४) म्हणणे मांडावे लागणार आहे.
पोलिसांनी ड्रग्ज पेडलर रईस देशमुख, तौसिफ सय्यद आरिफ व कृणाल उर्फ लकी पाटील यांच्याकडून ६ लाख रुपयांचे ड्रग्ज हस्तगत करुन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कारमधून ड्रग्जची विक्री करणाऱ्या तिघाना पकडल्यानंतर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. यामध्ये रईस देशमुख याने ते ड्रग्ज अमजद उर्फ बिल्डर शेख (रा. फातेमा नगर) याच्याकडून तौसिफ आरिफ याने इम्रान उर्फ इम्मा हसन हुसेन भिस्ती (रा. शाहूनगर) याच्याकडून तर कृणाल उर्फ लकी पाटील याने अनवर पटेल (रा. सुप्रीम कॉलनी) यांच्याकडून विक्रीसाठी घेतल्याची कबुली दिली होती. फरार असलेल्या अमजद उर्फ बिल्डर शेख व इम्रान उर्फ इम्मा हसन हुसेन भिस्ती याचा पोलिसांकडून शोध घेतला जात असून, त्यातील इम्रान उर्फ इम्मा भिस्ती याने अटकपूर्वसाठी तर न्यायालयीन कोठडीतील संशयित ड्रग्ज पेडलर तौसिफ सय्यद आरिफ याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. त्या दोघांच्या जामीन अर्जावर न्यायालयाने पोलिसांना म्हणणे मांडण्यास सांगितले असून, २४ जूनपर्यंत तपास यंत्रणा आपले म्हणणे सादर करण्याची अपेक्षा आहे.