मेन
---
वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या जिवाशी खेळ
आहारात अपायकारक द्रव्य मिसळण्याचा कट, तिघांवर गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. २३ : शहरातील होळतर्फे हवेली शिवारातील समाजकल्याण विभागाच्या महिला वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत वादातून विद्यार्थिनींच्या जेवणात अथवा पिण्याच्या पाण्यात अपायकारक द्रव मिसळण्याबाबतच्या कथित संभाषणाची ध्वनिफीत व्हायरल झाल्याने विद्यार्थिनींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेनंतर संतप्त विद्यार्थिनींनी दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी वसतिगृहासमोर आंदोलन केले. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला. सामाजिक व विद्यार्थी संघटनांसह काही राजकीय पदाधिकाऱ्यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला.
महिला वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत वादामुळे विद्यार्थिनींच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप झाल्यानंतर समाजकल्याण विभागाने संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्याला सेवेतून मुक्त केले असले तरी केवळ सेवामुक्ती पुरेशी नसून दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी विद्यार्थिनींनी केली. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी विविध सामाजिक व विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली आहे.
तिघांवर गुन्हा, एकास अटक
विद्यार्थिनींच्या आंदोलनानंतर प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने दखल घेत कंत्राटी कर्मचाऱ्यांसह तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यातील एका संशयिताला अटक करण्यात आली असून, उर्वरित दोघे फरारी आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
---
कोट
वसतिगृहात घडलेल्या प्रकरणाबाबत प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. खासगी कंत्राटदाराला तडकाफडकी सेवामुक्त करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे तिघांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसतिगृहाचे सुरक्षारक्षक, शिपाई बदलण्यात आले आहे. याप्रकरणात दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
- सुंदरसिंग वसावे,
सहायक आयुक्त समाजकल्याण विभाग नंदुरबार
---
कोट
समाजकल्याण वसतिगृहातील तीन कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आपसातील संवादाची एक क्लिप व्हायरल झाली आहे. त्यानुसार मुलींच्या जिवाला धोका उत्पन्न होईल, असे कृत्य करण्याचा कट रचला जात होता, असे आढळून आले. संशयितांना नेमके काय करायचे होते? यामागे त्यांचा हेतू काय होता, याचा तपास पोलिस करीत आहे. दोषींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
- अश्विनी सानप, जिल्हा पोलिस अधीक्षक, नंदुरबार
---
चौकट
चित्रा वाघ यांनी अधिवेशनात उठविला आवाज
सध्या सुट्या असल्या तरी २२ विद्यार्थिनी समाजकल्याण विभागाच्या महिला वसतिगृहात अभ्यास करण्यासाठी राहात होत्या. अन्नात, पाण्यात अपायकारक द्रव मिसळण्याचा कट करणे, याप्रकरणी सरकार कार कारवाई करणार आहे, असा सवाल आमदार चित्रा वाघ यांनी विधानसभा अधिवेशनात उपस्थित केला. यावर उत्तर देताना मंत्री शंभुराज देसाई यांनी याबाबत अहवाल मागविण्यात येईल व संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.