टुडे पान तीनसाठी मेनफिचर
--------------------------
NSK26H22438
जळगाव : महापालिकेत बुधवारी ई-व्हेईकल स्टेशनबाबतच्या बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना देताना उपमहापौर मनोज चौधरी. सोबत स्थायी समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर पाटील.
..........
महापालिकेचे ई-व्हेईकल स्टेशन ठरताय पांढरा हत्ती
------------
उत्पन्नापेक्षा खर्च अधिक; उपमहापौरांनी घेतलेल्या आढावातून माहिती आली समोर
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २४ : पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी जळगाव महापालिकेने सुरू केलेल्या इलेक्ट्रिक वाहन (ई-व्हेईकल) चार्जिंग स्टेशनच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी उपमहापौर मनोज चौधरी व स्थायी समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता.२४) विशेष बैठक घेतली. यात सात महिन्यांच्या उत्पन्नापेक्षा चार्जिंग स्टेशनवरील सुरक्षारक्षकांचे वेतन देण्यातच पैसा अधिक जात असल्याचे समोर आले.
या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या माहितीनुसार प्रभात कॉलनीतील बहिणाबाई उद्यान, सागर पार्क मैदान या दोन ठिकाणी महापालिकेचे चार्जिंग स्टेशन आहेत. या दोन्ही चार्जिंग स्टेशनमधून गेल्या सात महिन्यांत अंदाजे २ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. दुसरीकडे, दोन्ही स्टेशनच्या संचालनासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या वेतनावर दरमहा सुमारे १ लाख २० हजार रुपये खर्च होत आहेत. वीज बिलासाठी सुमारे ६ हजार रुपये खर्च होत असल्याची माहिती समोर आली आहे.
या बैठकीला शहर अभियंता योगेश बोरोले, पर्यावरण अधीक्षक प्रकाश पाटील, विद्युत अभियंता संदीप मोरे, संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जागृती करणे आवश्यक
चार्जिंग स्टेशनचा वापर वाढवून महापालिकेच्या उत्पन्नात भर घालण्याच्यादृष्टीने विविध उपाययोजनांवर या बैठकीत विचारमंथन करण्यात आले. शहरातील इलेक्ट्रिक वाहनधारकांपर्यंत या सुविधेची माहिती अधिक प्रभावीपणे पोहोचविणे, व्यापक जनजागृती मोहीम राबविणे, सोशल मीडिया व अन्य डिजिटल माध्यमांतून प्रचार करणे, ई-वाहन वापरकर्त्यांना आकर्षित करणारे उपक्रम हाती घेण्याबाबत सूचना उपमहापौर व स्थायी सभापती यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
उत्पन्नवाढीसाठी नियोजन करा
उपमहापौर चौधरी यांनी महापालिकेने उभारलेल्या सुविधांचा जास्तीत जास्त वापर होणे आवश्यक असल्याचे सांगत उत्पन्नवाढीसाठी ठोस नियोजन करण्याचे निर्देश दिले. पर्यावरण संवर्धनाच्यादृष्टीने शहरात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा व नागरिकांनी चार्जिंग स्टेशनच्या सुविधेचा अधिक लाभ घ्यावा, यासाठी प्रयत्न करण्यावर भर देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.