आठवडाभरात सोन्याचे भाव दहा हजारांनी कमी
(उपशीर्षक)
सोने एक लाख ४० हजार रुपयांवर; चांदीतही मोठी घसरण
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २५ ः येथील सराफा बाजारात गुरुवारी (ता. २५) सोन्याच्या भावात तीन हजार, चांदीत पाच हजार रुपयांनी घसरण झाली. दरम्यान, गेल्या आठ दिवसांत सोने दहा हजारांनी, तर चांदी वीस हजार रुपयांनी कमी झाली आहे. यामुळे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीमधील बदल, डॉलरच्या मूल्यातील चढ-उतार आणि गुंतवणूकदारांचा बदलता कल यामुळे मौल्यवान धातूंच्या किमतीवर परिणाम होत आहे. परिणामी, देशांतर्गत बाजारातही सोने आणि चांदीच्या भावात घसरण होत आहे. दोन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण झाल्याचे दिसून येत आहे.
चांदी पुन्हा पाच हजारांनी खाली
गेल्या आठवड्यापासून चांदीचे भाव २० हजार रुपयांनी खाली आले आहेत. गुरुवारी चांदी दर पाच हजार रुपयांनी खाली आली. दोन लाख २० हजार (प्रतिकिलो, विनाजीएसटी) रुपयांपर्यंत चांदी खाली आली आहे. याशिवाय सोने एक लाख ४३ हजार रुपयांवरून (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी) एक लाख ४० हजार रुपयांपर्यंत खाली आले आहे. यानंतर सलग दोन दिवसांपासून भाव कमी झाले आहेत.
आठवडाभरातील सोन्या-चांदीचे भाव
तारीख--- सोने (प्रतिदहा ग्रॅम)--- चांदी (प्रतिकिलो, विनाजीएसटी)
१८ जून--- १ लाख ४८ हजार ६००--- २ लाख ४७ हजार
१९ जून--- १ लाख ४५ हजार ५००--- २ लाख ३७ हजार
२१ जून--- १ लाख ४५ हजार ३००--- २ लाख ३७ हजार
२२ जून--- १ लाख ४६ हजार ५००--- २ लाख ४२ हजार
२३ जून--- १ लाख ४४ हजार ५००--- २ लाख ३० हजार
२४ जून--- १ लाख ४३ हजार------ २ लाख २५ हजार
२५ जून--- १ लाख ४० हजार------ २ लाख २० हजार