29008
आकांक्षा शेलार
बसच्या चाकाखाली सापडून मुलगी ठार
ठक्कर बाजार बसस्थानकातील घटना;
...
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ७ : अखेरच्या श्रावणी सोमवारनिमित्ताने पालकांसमवेत त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी ठक्कर बाजार बसस्थानकात आलेली १७ वर्षीय मुलगी एसटी बसच्या मागील चाकाखाली सापडून ठार झाली. आकांक्षा रामभाऊ शेलार (१७, रा. पळसे, नाशिक रोड) असे मृत युवतीचे नाव आहे. पालकांच्या डोळ्यासमोर घटना घडल्याने त्यांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. दरम्यान, श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर बसस्थानकात गर्दी होत असते, याची जाणीव असतानाही याठिकाणी ना पोलिसांचा बंदोबस्त होता, ना एसटी महामंडळाकडून नियोजन.
करण उत्तम वारुंगसे (२१, रा. पळसे) याच्या फिर्यादीनुसार, रविवारी (ता. ६) त्र्यंबकेश्वर येथे श्रावणी सोमवारनिमित्ताने दर्शनासाठी तो, आई व मावशीसह मानलेल्या बहिणी आकांक्षा व वैष्णवी यांच्यासह तो ठक्कर बाजार बसस्थानकात रात्री पोहोचला. त्यावेळी बसस्थानकावर त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी भाविकांची तोबा गर्दी होती. रात्री त्र्यंबकला जाणारी एसटी बस (एमएच ४० वाय ५६६२) फलाटावर लागत असतानाच प्रवाशांची बसमध्ये चढण्यासाठी आणि जागा मिळविण्यासाठी एकच झुंबड उडाली. प्रवाशांनी गर्दी करीत आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. काहींनी बसच्या खिडक्यातील आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केले. त्याचवेळी बसमध्ये चढण्यासाठी आकांक्षाही गर्दीमध्ये शिरली. बसचालक भिका एकनाथ अहिरे (वय ४५, रा. सेवाकुंज, पंचवटी) याने बस सुरू केल्याने पुन्हा प्रवाशांनी आतमध्ये शिरण्यासाठी ढकलाढकली केली असता, त्यावेळी चढत असताना आकांक्षाचा पाय निसटला आणि ती खाली कोसळली. त्याचवेळी ती बसच्या डाव्याबाजुकडील मागच्या चाकाखाली सापडली. बसचे चाक तिच्या पोट व कमरेवरून गेल्याने ती गंभीररित्या जखमी झाली. आकांक्षा बसच्या चाकाखाली सापडताच, तिच्या आईने किंचाळी मारली. पण तोपर्यंत आकांक्षा चाकाखाली चिरडली गेली होती. भाऊ करण याने तातडीने तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आकांक्षा हिस तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात बसचालक भीका अहिरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
---------------
१८ ऑक्टोबरला होता वाढदिवस
नाशिक रोड येथील महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या आकांक्षाचा १७ ऑक्टोबरला १८ वा वाढदिवस होता. परंतु त्यापूर्वीच शेलार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
-----------
ना पोलिस, ना नियोजन
श्रावणी सोमवारनिमित्ताने रविवारपासून (ता.६) ठक्कर बाजार बसस्थानकावर भाविकांची त्र्यंबकला जाण्यासाठी गर्दी केली होती. पोलिस प्रशासनाकडून या पार्श्वभूमीवर बंदोबस्ताचे नियोजन केलेले असताना आणि, परिवहन महामंडळाकडूनही प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून नियोजन केले जाते. परंतु, रविवारी ठक्कर बाजार बसस्थानकात ना पोलिस होते, ना परिवहन महामंडळाचे नियोजन होते. या गलथान व्यवस्थेचा आकांक्षा बळी ठरल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.