‘वर्क फ्रॉम होम’च्या
आमिषाने ४५ लाख गमावले
नाशिक, ता. १६ : ऑनलाइन वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून आर्थिक लाभाचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी एका व्यावसायिकाला तब्बल ४५ लाख ५० हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शहर सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
५४ वर्षीय तक्रारदाराच्या फिर्यादीनुसार, भामट्यांनी त्यांना टेलिग्राम या संकेतस्थळावरून संपर्क साधून वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळविण्याचे आमिष दाखविले होते. १६ जुलै ते ७ सप्टेंबरदरम्यान टास्कसाठी भामट्यांनी लिंक शेअर केली असता, ती ओपन करताच डग्लस इलिमॅन नावाच्या कंपनीचे पेज उघडले. भामट्यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांनी त्यात नोंदणी केली. यात ४५ सदस्य ग्रुपमध्ये होते. यात नफा होत असल्याचे दिसत असताना तो मिळविण्यासाठी भामट्यांनी त्यांना वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे भरण्यास भाग पाडले. ४५ लाख ५० हजार रुपये गेल्यानंतरही कामाची रक्कम मिळत नसल्याचे पाहून फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी शहर सायबर पोलिसात धाव घेतली. त्यानुसार, संशयित आयडी मनोहर झिंजाळ, प्रसन्ना मेघा, आशुतोष प्रभू आणि मेंबर सपोर्टवर सायबर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक सुशीला कोल्हे तपास करीत आहेत.