अँकर
---
निफाडमधील ९६ गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे
राजकीय हालचाली गतिमान; सोडतीमुळे बदलली पारंपरिक समीकरणे
सकाळ वृत्तसेवा
पिंपळगाव बसवंत, ता. २४ : निफाड तालुक्यात ९६ गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. दोन महिन्यांनी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झालेला नसला तरी इच्छुक उमेदवार आणि राजकीय गटांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.
---
सोयीच्या तर कुठे गैरसोयीच्या सोडतीमुळे अनेक गावांतील पारंपरिक राजकीय समीकरणे बदलली आहेत. काही इच्छुकांचे वॉर्ड बदलले असून, काहींच्या आरक्षणात बदल झाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. परिणामी, संभाव्य उमेदवारांसह राजकीय नेते आणि गावपुढारी गावागावांत सक्रिय झाले आहेत. मतदारांशी संपर्क वाढविणे, कार्यकर्त्यांच्या बैठका घेणे आणि पॅनल उभारणीची चाचपणी सुरू झाली आहे. सध्या विविध राजकीय गटांकडून उमेदवारांची निवड करताना त्यांच्या सामाजिक प्रभावासह आर्थिक स्थिती, गावातील प्रतिष्ठा, भावकी आणि निवडून येण्याची क्षमता यांचा अभ्यास केला जात आहे. अनेक गावांत एकाच गटाची सत्ता दीर्घकाळ राहिल्याने विकासकामांबाबत नाराजी असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. पाणी, वीज, रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधांबाबतही अनेक गावांत प्रश्न कायम असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.
---
राजकीय कारकिर्दीची संधी
ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये तरुणांचा वाढता सहभाग हे यंदाचे वैशिष्ट्य ठरणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत विकास निधी थेट ग्रामपंचायतीकडे उपलब्ध होत असल्याने अनेक युवक या निवडणुकीकडे राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा करण्याची संधी म्हणून पाहत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी नव्या चेहऱ्यांचे आव्हान विद्यमान पदाधिकाऱ्यांसमोर उभे राहण्याची शक्यता आहे.
---
आरोप-प्रत्यारोप सुरू
निवडणुकीची चाहूल लागताच गावोगावी विकासकामांचे उद्घाटन, भूमीपूजन, लोकार्पण कार्यक्रमांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार असल्याचे चित्र तालुक्यात आहे.
---
कोणता गट मारणार बाजी
निफाड मतदारसंघातील होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गावागावात आमदार दिलीप बनकर, माजी आमदार अनिल कदम, भाजपाचे जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांच्या गटातील समर्थकांमध्ये दुरंगी किंवा तिरंगी लढती रंगणार आहेत. यानिमित्ताने गावपातळीवरील राजकारणाला वेग येणार आहे. मुद्द्याची लढाई गुद्द्यावरही जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कोणत्या गावात सत्तांतर घडते, कोणता गट बाजी मारतो याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
---