SNR26B22941
सिन्नर ः निफाड मार्गावर बारागावपिंप्रीजवळ तुटलेला ढापा.
-----------
३६-४
पुलावरील तुटलेला ढापा धोकादायक
-----------
बारागावपिंप्री शिवार ः बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाबद्दल संताप
-----------
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता.३ ः सिन्नर- निफाड या महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या मार्गावर बारागावपिंप्री शिवारातील पुलाजवळ रस्त्याच्या मधोमध असलेला लोखंडी ढापा पूर्णपणे तुटला आहे. तुटलेला ढापा वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या मार्गावरून दिवसरात्र मोठ्या प्रमाणावर जड वाहने, बस आणि दुचाकींची वाहतूक सुरू असते. रस्त्याच्या अगदी मध्यभागीच हा ढापा तुटल्यामुळे वेगात येणाऱ्या वाहनांची चाके थेट या खड्ड्यात अडकत आहेत. यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. सर्वात मोठा धोका दुचाकी चालकांना निर्माण झाला असून, खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकी घसरून अनेक चालक जखमी झाल्याच्या घटना गेल्या दोन दिवसांत घडल्या आहेत.
दिवसा कसातरी हा धोका नजरेस पडतो, मात्र रात्रीच्या वेळी तुटलेला ढापा वाहनचालकांना दिसत नाही. त्यामुळे अपघाताची टांगती तलवार निर्माण झाली आहे. यापूर्वीही याच ठिकाणी अनेकदा लोखंडी ढापा तुटण्याचे प्रकार घडले आहेत. स्थानिक रहिवासी आणि वाहनचालकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन हा लोखंडी ढापा दुरुस्त करावा आणि हा मार्ग सुरक्षित करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
--------------