
Nashik News : नांदगाव बाजार समितीतून ट्रॅक्टर चोरीला; संतप्त शेतकऱ्यांचा प्रवेशद्वारावर रास्तारोको
नांदगाव (जि. नाशिक) : येथील बाजार समितीच्या कांदा विक्रीसाठी आणलेला नवा कोरा ट्रॅक्टर चोरीला गेल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (ता.१६) लिलावासाठी आलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोरील येवला रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केले चोरीला गेलेला ट्रॅक्टर शोधून द्यावा अथवा ट्रॅक्टरची नुकसान भरपाई बाजार समितीने करून द्यावी अशी मागणी केली.
शेतकऱ्यांनी केलेल्या या अचानक रास्ता रोकोमुळे येवला-नांदगाव रस्त्यावर दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. (Tractor stolen from Nandgaon market committee Angry farmers block entrance agitation Nashik News)
आठवडे बाजार असल्यामुळे बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात बुधवार पासूनच आवक सुरु होती रात्री नऊच्या दरम्यान माणिकपुंज (ता. नांदगाव) येथून अर्जुन कोल्हे यांनी जॉन डिअर कंपनीचा ट्रॅक्टर (क्रमांक एमएच ४१-बीएच १४८७) नवा कोरा ट्रॉली (एमएच १५ ३०३२ ) सह लिलावाच्या नंबरवर समितीच्या आवारातील विहिरीजवळ उभा केला होता.
रात्रीच्या जेवणासाठी थोड्या वेळासाठी ते बाहेर जाऊन माघारी परतले तेव्हा त्यांना जागेवर फक्त ट्रॉली दिसली. मात्र ट्रॅक्टर दिसला नाही. ट्रॉली जागेवर उभी ठेवून चोरट्यांनी त्यांचा हा ट्रॅक्टर बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर काढीत पसार केला.
जेव्हा ही बाब शेतकऱ्याच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी बाजार समिती व पोलिसांना ही बाब कळविली. सकाळी लिलावाचे कामकाज सुरु होण्यापूर्वीच सातपट शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाला जाब विचारला व रास्ता रोको सुरु केले.
पोलिस व बाजार समिती प्रशासनाने संतप्त शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करूनही रास्तारोको सुरूच होते. हे कळताच येवला येथून उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंग साळवे घटनास्थळी आले.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
त्यांनी संतप्त आंदोलक शेतकऱ्यांची त्यांनी समजूत काढीत पोलिस तपासातून लवकर धागेदोरे लागतील असे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी रास्तारोको मागे घेतले. रास्तारोको नंतर शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयात सचिव अमोल खैरनार यांना धारेवर धरीत चोरी झालेल्या ट्रॅक्टरची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली. परंतु पोलिसांनी यात हस्तक्षेप केला.
पोलिसांपुढे आव्हान
कांदा विक्रीसाठी आणलेला नवा ट्रॅक्टर चोरीला जाण्याचा हा पहिला प्रसंग नाही. यापूर्वी चार वर्षांपूर्वी देखील असाच प्रयत्न झाला होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरला होता.
सध्या अलीकडच्या काळात शहरात दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ झाली असल्याच्या पार्श्वभूमीवर चोरट्यांचे चक्क ट्रॅक्टर चोरीपर्यंत धाडस वाढल्याने पोलिसांसमोर चोरटे शोधून काढण्याचे आव्हान उभे राहिले आहे.