Latest Marathi News | नाशिक शहराला वाहतूक कोंडीचे ग्रहण; महागाईच्या काळात इंधनाची नासाडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik traffic

नाशिक शहराला वाहतूक कोंडीचे ग्रहण; महागाईच्या काळात इंधनाची नासाडी

नाशिक : पावसाच्या संततधारेने आधीच सुंदर रस्त्यांचे शहर खड्ड्यांत गेले आहे. त्यातच, द्वारका, मुंबई नाका, मायको सर्कल, सारडा सर्कल या वाहतूक बेटाची असलेली अकारण रुंदी अन् वाहतूक सिग्नल्सवर कमी- अधिक वेळांमुळे या ठिकाणी वाहतूक तुंबून वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागतात. यामुळे ऐन मोक्याच्या वेळी वाहतूक कोंडीत अडकून अनेकांना दररोज हकनाक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

यात वेळेचा अपव्यय तर होतोच, शिवाय ‘भयंकर’ महागाईच्या काळात इंधनाची नासाडी होऊन आर्थिक झळही वाहनचालकांना सोसावी लागते आहे. वाहतूक कोंडी सोडविताना पोलिस यंत्रणा सतर्क असल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे बेशिस्त वाहनचालकांची भर वाहतूक कोंडी होण्यास कारणीभूत ठरते. या साऱ्या वाहतुकीच्या तुंबाईची सोडवणूक करायची तरी कशी, या यक्ष प्रश्‍नाने नाशिककरांसह यंत्रणेचेही कोंडी झाली आहे. (Latest Marathi News)

हेही वाचा: नाशिक : पिता आणि पुत्र एकाचवेळी बनले आयर्नमॅन!

वाहतूक बेटांबाबत प्रस्ताव

शहराच्या वाहतुकीचा श्‍वास समजल्या जाणाऱ्या द्वारका चौकातील वाहतूक कोंडी ही सर्वात मोठी डोकेदुखी आहे. वाहतुकीची सर्वाधिक वर्दळ असलेला द्वारका चौक दिवसरात्र वाहतुकीच्या कोंडीत अडकला आहे. येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी येथे आत्तापर्यंत शेकडो उपाययोजना राबविण्यात आल्या, मात्र साऱ्याच अपयशी ठरल्या आहेत. अशीच स्थिती मुंबई नाका सर्कल, मायको सर्कलची आहे.

यासंदर्भात नाशिक शहर वाहतूक पोलिसांकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला प्रस्ताव देण्यात आला असून, त्यानुसार वाहतूक कोंडी होणारी सर्कल्स हटविण्यात यावी. त्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा सुरू केल्याने वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होऊ शकते, असे नमूद केले आहे. परंतु अद्यापपर्यंत यासंदर्भात कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही.

हेही वाचा: पाणी साचल्याने साथरोग वाढीस; मनपाचे धुरफवारणीकडे दुर्लक्ष

इंदिरानगर बोगद्याची रुंदी वाढणार

द्वारका व मुंबई नाका सर्कलनंतर सर्वाधिक वाहतूक कोंडी व वाहनचालकांना त्रासदायक ठरणारे शहरातील एकमेव केंद्र म्हणजे इंदिरानगर बोगदा. नाशिक रोडकडून नाशिक, अंबड- सातपूर एमआयडीसी, गंगापूर रोडला जोडणारा हा रस्ता आहे. परंतु, या ठिकाणची कोंडी नित्याचीच. कोंडी सोडविण्यासाठी बोगद्यातील वाहतूक एकेरी केल्यानंतरही समस्या सुटलेली नाही.

उड्डाणपूल, सर्व्हिस रोड याशिवाय इंदिरानगरकडे व इंदिरानगरकडून सिटी सेंटर मॉलकडे जाणारी वाहतूक एकत्र येते. परिणामी वाहतुकीचा गुंता होऊन नाशिककरांच्या डोक्याला रोजचाच ताप आहे. यासाठी, या बोगद्याची रुंदी वाढविण्याचा प्रस्ताव लालफितीच्या कारभारात अडकला आहे. त्यासाठी पोलिस व मनपा या दोन्ही यंत्रणेकडून पाठपुरावा सुरू आहे.

हेही वाचा: शिक्षक भरती आता MPSCच्या धर्तीवर; पुढील भरती नव्या पद्धतीनुसारच होणार

सिग्नल, पोलिस असूनही...

नाशिक शहरातील प्रशस्त अन् सुंदर रस्त्यांची भुरळ अनेकांना नसेल तर नवल. स्मार्ट रोड प्रशस्त केला, परंतु या रोडवरील अनधिकृत पार्किंगमुळे रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडीच्या विळख्यात स्मार्ट रोड सापडला आहे. सिटी सेंटर मॉल सिग्नल, जेहान सर्कल, त्र्यंबक नाका, मेहेर सिग्नल ही वाहतूक कोंडीचे सिग्नल्स आहेत. याठिकाणी वाहतूक पोलिस नियुक्तीवर असतात, परंतु वाहतूक कोंडी सोडविण्याऐवजी त्यांचे लक्ष ‘टार्गेट़’ पूर्ण करण्यावरच अधिक असते. काही सिग्नल यंत्रणांच्या वेळेमध्ये तफावत आहे.

३० सेकंदापासून ते दोन मिनिटांपर्यंत सिग्नलच्या वेळा निश्‍चित केलेल्या असल्या तरी यात अनेक ठिकाणी तफावत आहे. तर काही ठिकाणी बेशिस्त वाहनचालक सिग्नलला जुमानत नाहीत. परिणामी, सिग्नल कोलमडून वाहतुकीची कोंडी होते. तर, काही सिग्नलवर वाहतुकीचा अतिरिक्त ताण असल्याने अशावेळी वाहनचालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर केला तर सिग्नलवरचा ताण कमी होऊन वाहतूक नियमांचे पालन केल्यास कोंडीची समस्या सुटण्यास मदत होऊ शकते.

हेही वाचा: Potholes Effects : पाठीच्‍या दुखापतीपासून फ्रॅक्‍चरच्‍या वाढल्‍या तक्रारी

वेळचा अपव्यय; इंधनाची नासाडी

सर्वाधिक कोंडी द्वारका, इंदिरानगर बोगदा, सिटी सेंटर मॉल या ठिकाणी होते. रहदारीच्या वेळी साधारण १५ ते २० मिनिटांपेक्षा अधिकचा वेळ याठिकाणी कोंडी होते. त्यामुळे वाहनचालकांच्या वेळेचा जसा अपव्यय होतो तसाच, इंधनाचीही नासाडी होते. मोठी वाहने कोंडीत बंद पडली तर समस्या गंभीर होते. नाशिककरांना यामुळे हकनाक आर्थिक झळ दररोज सोसावी लागते आहे.

Web Title: Traffic Congestion In Nashik City Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikTraffic