नाशिक : स्मार्टसिटीची कामे लांबल्याने शहरात वाहतूक कोंडी | Nashik Smart City work | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Traffic jam

नाशिक : स्मार्टसिटीची कामे लांबल्याने शहरात वाहतूक कोंडी

पंचवटी (नाशिक) : शहराच्या अनेक भागात स्मार्टसिटीअंतर्गत (Smart City) मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र ही कामे लांबल्याने शहराच्या छोट्या गल्लीबोळात वाहतुकीची कोंडी (Traffic jam) होऊ लागल्याने स्थानिकांसह वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या स्मार्टसिटीअंतर्गत शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर रस्त्याची व इतर कामे सुरू आहेत.

वाहतूककोंडीमुळे वाहनधारकांत हमरीतुमरी

मुख्य रस्त्यावर कामे सुरू असल्याने दुचाकीसह चारचाकी वाहनधारक जवळच्या रस्त्याची निवड करतात. एकतर शहरातील अनेक गल्ल्या चिंचोळ्या आकारातील आहेत. त्यातच अनेक व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमणे केली आहेत. तर काही ठिकाणी खरेदीदार रस्त्यावर दुचाकी चारचाकी वाहने उभी करतात. मात्र, यामुळे वाहतूक कोंडीत भरच पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेकदा वाहनधारकांत हमरीतुमरीही अनुभवण्यास मिळत आहे. गाडगे महाराज पुलावरून शहरात जाण्यासाठी दिल्ली दरवाजामार्गे जवळचा रस्ता आहे. मात्र याठिकाणी गेल्या कित्येक महिन्यांपासून रस्त्याचे काम सुरू असल्याने नाव दरवाजा व सराफ बाजार, भांडी बाजार रस्त्याचा वापर पादचारी, वाहनधारक करत आहेत. परंतु, हा रस्ता अतिशय चिंचोळा आहे. त्यातच सराफ, भांडी, कापड या व्यापारी पेठा असल्याने कायम गर्दी असते. तर नाव दरवाजा भागातील रस्ताही छोटा असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी अनुभवण्यास मिळत आहे. पंचवटी परिसरातील सरदार चौक, गोरेराम मंदिर गल्ली, सीता गुंफा भागातही अशी परिस्थिती आढळून येते.

हेही वाचा: नाशिक : अंध-अपंग दांपत्याच्या घरातही अंधार

आडगाव नाक्यावरून मेनरोड किंवा शालिमार चौकाकडे जाण्यासाठी गाडगे महाराज पुलावरून दिल्ली दरवाजामार्गे जवळचा मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहनांसह पायी चालणाऱ्यांची नेहमी मोठी वर्दळ असते. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून वीर सावरकर पथ ते दिल्ली दरवाजा या रस्त्याचे ‘स्मार्ट’ काम सुरू आहे. हे काम लांबल्याने येथील व्यावसायिकांसह, रहिवाशांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

''नाव दरवाजा परिसरातील रस्ता अतिशय अरुंद आहे. एकावेळी दोन्हीकडून वाहने आल्यास मोठी कोंडी होते. त्यामुळे मुख्य ठिकाणच्या रस्त्यांची कामे होईपर्यंत या ठिकाणहून चारचाकी वाहनांना वाहतुकीस परवानगी नको.'' - भास्करराव तांबे, रहिवासी, नाव दरवाजा

हेही वाचा: सप्तशृंगगडावर नवसपूर्तीसाठी भाविकांची गर्दी; कोरोना नियमांचा फज्जा

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashik
loading image
go to top