
काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! भयानक अपघातात प्रवासी सुरक्षित
जुने नाशिक : मुंबई नाका परिसरात उड्डाणपुलावरून चारचाकी उलटून सर्व्हिस रोडवर पलटी झाल्याची घटना शनिवारी (ता. २१) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. चारचाकीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने दुर्घटना टळली. इतका भयानक अपघात होऊनदेखील कुठलीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झाले नाही. अपघाताची तीव्रता बघता ‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती’ अशी चर्चा परिसरात रंगली होती.
कारचा झाला अक्षरशः चुराडा
नवी मुंबई खारघर येथील सुनीलकुमार निहालचंद जैन पत्नी आणि मुलीसह त्यांच्या कारमधून (एमएच- ४६- बीझेड- ६०११) मुंबईकडून मालेगावच्या दिशेने जात होते. इंदिरानगर बोगद्याच्या पुढे असलेल्या उड्डाणपुलावरून कार अचानक पलटी होऊन सर्व्हिस रोडवर येऊन उलटली. सुदैवाने जैन कुटुंबातील तिघांनाही कुठलीही हानी पोचली नाही. तसेच सकाळची वेळ असल्याने सर्व्हिस रोडवरदेखील वाहन तसेच नागरिक नसल्याने मोठा अनर्थ टळला. अपघाताची तीव्रता इतकी होती, की कारचा अक्षरशः चुराडा झाला. शिवाय उड्डाणपुलास लावलेला संरक्षण पत्रादेखील कारमध्ये घुसून फसला होता.
अग्निशमन विभागास घटनेची माहिती मिळताच लिडींग फायरमन श्याम राऊत, फायरमन विजय शिंदे, किशोर पाटील, सोमनाथ थोरात, ज्ञानेश्वर दराडे, अभिजित देशमुख, ट्रेनी महिला फायरमन सायली काथवटे घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून वाहनात घुसलेला पत्रा बाहेर काढण्यात आला. अपघातामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली. कारचे झालेले नुकसान आणि घटनास्थळावर असलेली परिस्थिती बघता अपघातामध्ये जीवितहानी झाली असण्याची शक्यता वर्तवली जात होती. प्रत्यक्षात मात्र तसे काही झाले नाही. जबरदस्त अपघात होऊनदेखील जैन कुटुंब सुखरूप असल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले. शिवाय काळ आला होता पण वेळ आली नव्हती, अशा प्रकारची चर्चा परिसरात होताना दिसली. उड्डाणपुलावर वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यात येत नसल्याने अशा प्रकारचे अपघात घडत असतात. उड्डाणपुलावरदेखील वाहतूक पोलिसांची नियुक्ती करून वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवल्यास, असे अपघात घडणार नसल्याचेही नागरिकांनी सांगितले.
हेही वाचा: दुर्दैवी! बहिणीच्या वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असतानाच भावाचा अंत; परिसरात हळहळ
हेही वाचा: नाशिक : दुभाजक ठरतंय वाहनधारकांच्या मृत्यूला आमंत्रण
Web Title: Traveler Safe In A Terrible Car Accident In Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..