Onion Rate Hike: उन्हाळ कांद्याच्या भाववाढीचा ‘ट्रेंड’! पिंपळगावमध्ये आठवड्यात सरासरी 551 रुपयांची वृद्धी

पावसाअभावी खरीप लागवड लांबणीवर
onion rates
onion ratesesakal

Onion Rate Hike : राज्यात उन्हाळ कांद्याच्या भाववाढीचा ‘ट्रेंड’ तयार झालाय. कांद्याचे आगार असलेल्या पिंपळगावमध्ये गेल्या आठवड्यात क्विंटलला सरासरी ५५१ रुपयांची वृद्धी झाली आहे.

दुसरीकडे कांद्याच्या पट्ट्यात मॉन्सूनने ओढ दिल्याने खरीप कांद्याच्या लागवडीला महिनाभराचा विलंब होणार असल्याने कांद्याच्या भाववाढीचा आलेख कायम राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांसह निर्यातदारांमधून व्यक्त करण्यात येत आहे. (trend of summer onion price hike average increase of Rs 551 per week in Pimpalgaon nashik)

पिंपळगाव बसवंतमध्ये (जि. नाशिक) क्विंटलभर कांद्याला १ ऑगस्टला एक हजार ३५० रुपये असा सरासरी भाव मिळाला होता.

दुसऱ्या दिवशी त्यात ५०, तिसऱ्या दिवशी १५०, चौथ्या दिवशी २५०, पाचव्या दिवशी ४०० रुपयांची वाढ झाली. सोमवारी (ता. ७) एक हजार ९००, तर आज एक हजार ९०१ रुपये क्विंटल या सरासरी भावाने इथे उन्हाळ कांद्याला शेतकऱ्यांना भाव मिळाला आहे.

पावसाने केलेले नुकसान कारणीभूत

कांद्याचे पावसाने केलेले ३० ते ४० टक्क्यांपर्यंतचे नुकसान हे भाववाढीसाठी कारणीभूत ठरले आहे. आता साठवून ठेवलेल्या चाळीतील कांदा १५ दिवसांमधून एकदा वर-खाली करावा लागतो.

त्यात दोन ते तीन टक्के कांद्याचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांना आढळत आहे. सद्यस्थितीत निर्यातदारांपर्यंत पोहोचलेल्या माहितीनुसार ‘नाफेड'तर्फे १५ ऑगस्टपर्यंत कांदा खरेदी होणार असली, तरीही खरेदीला मुदतवाढ मिळू शकते.

निर्यातदारांनी एकूण कांद्याच्या उपलब्धतेचा अंदाज घेऊन खरेदीला प्राधान्य दिले आहे. नाशिक जिल्ह्यात कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार ३० टक्क्यांपर्यंत म्हणजे, सात ते आठ लाख टनांपर्यंत कांदा चाळीत आहे. बरेच शेतकरी दसरा ते दिवाळीच्या आसपास चाळीतील कांदा विक्रीसाठी आणतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

onion rates
Nashik Onion Crop Crisis: पावसाने पाठ फिरविल्याने कांदा लागवडीस अडचण; शेतकऱ्यांच्या समस्येत वाढ

श्रीलंका-बांगलादेशचा हातभार

पाकिस्तानच्या कांद्याने आखाती देशातील बाजारपेठेत स्थान मिळविले आहे, त्यामागे भाव हे कारण आहे. निर्यातदारांच्या माहितीनुसार टनामागे भारतीय कांद्याच्या तुलनेत पाकिस्तानचा कांदा ८० ते १०० डॉलरने स्वस्त विकला जातो.

तरीही पाकिस्तानमधून येणाऱ्या कांद्याच्या प्रवासासाठी अधिकचा कालावधी लागत असल्याने मलेशियातील व्यापारी भारतीय कांद्याला पसंती देताहेत. सिंगापूरमध्येही कांद्याची निर्यात सुरू आहे. अशा परिस्थितीत श्रीलंका आणि बांगलादेशच्या आयातदारांनी निर्यातीला हातभार लावलेला आहे.

एका आठवड्यात श्रीलंकेत तीन हजार, बांगलादेशमध्ये चार ते पाच हजार, मलेशियात अडीच हजार, सिंगापूरमध्ये ८०० टन कांद्याची निर्यात झाली. श्रीलंकेसाठी कांद्याच्या निर्यातीचा टनाचा भाव ३५०, बांगलादेशचा ३३०, मलेशियाचा ३२०, सिंगापूरचा ३७० डॉलर आहे.

इतर राज्यांतील स्थिती अशी ः

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गुजरातमधील शेतकऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधल्यावर तेथे साठवणुकीत कांद्याचे प्रमाण कमी असून, खरिपात नवीन कांद्याची लागवड करण्यासाठी पावसामुळे शक्य झालेले नाही, अशी माहिती मिळाली.

कर्नाटकमध्ये सप्टेंबरमध्ये बाजारात येणाऱ्या कांद्याची लागवड यंदा कमी आहे. शिवाय, खरिपातील कांदा लागवडीला उशीर झाल्याने महाराष्ट्राच्या कांद्याच्या पट्ट्यातील नवीन कांदा यंदा ऑक्टोबरऐवजी नोव्हेंबरमध्ये तरी बाजारात येईल की नाही?

याबद्दलची शेतकऱ्यांमध्ये साशंकता आहे. त्यामुळे येत्या आठ ते पंधरा दिवसांत कांद्याच्या भावातील तेजीचे नेमके चित्र स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.

कांद्याच्या भावाची स्थिती

बाजारपेठांमधील कांद्याचा आजचा क्विंटलचा सरासरी भाव पुढीलप्रमाणे ः (कंसात १ ऑगस्टला क्विंटलचा सरासरी भाव रुपयांमध्ये दर्शवितो) : लासलगाव- १ हजार ७०० (१ हजार ३७०), सिन्नर-नायगाव- १ हजार ८०० (१ हजार १७५), चांदवड- १ हजार ७५० (१ हजार २५०), कोल्हापूर- १ हजार ४०० (१ हजार ३००), छत्रपती संभाजीनगर- १ हजार ३०० (८२०), मुंबई- १ हजार ४०० (१ हजार ४००), खेड-चाकण- १ हजार ३०० (१ हजार ३००), पुणे- १ हजार ४०० (१ हजार १५०).

onion rates
Onion : टोमॅटोनंतर आता कांदा रडवणार; दरात होऊ शकते विक्रमी वाढ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com