पाण्यासाठी जीवघेणी कसरत; सरकारी योजना वस्तीपासून दूरच| Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kharshet

VIDEO : पाण्यासाठी जीवघेणी कसरत; सरकारी योजना वस्तीपासून दूरच

नाशिक : खरशेत (ता. त्र्यंबकेश्‍वर) ग्रामपंचायतीच्या परिसरात बारा पाडे असून, गावातील अनेक कुटुंब शेतीसाठी पाड्यापासून दीड किलोमीटरवरील तास नदीच्या काठी वास्तव्यास आहेत. पंचवीस वस्त्यांमधील आदिवासींची (Tribals) संख्या तीनशेहून अधिक असून इथल्या महिलांना रोजच्या पिण्याच्या पाण्यासाठी नदीवर टाकण्यात आलेल्या बल्ल्यांवरून चालत जाण्याची, डोंबारींपेक्षाही भयानक कसरत दररोज करावी लागते.

दररोज जगण्या-मरण्याचा संघर्ष

सरकारी अनेक योजना गावात येतात; परंतु वस्तीपर्यंत पोचत नाहीत, ही येथील आदिवासींची व्यथा आहे. वस्तीपासून नदीजवळ आहे; पण पाणी शुद्ध नसल्याने झऱ्यांमधून महिलांना पाणी आणावे लागते. झरे नदीच्या पलीकडे असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत येथील महिलांना करावी लागत आहे. हरसूलकडून येणारी तास नदी येथून वाहते. या नदीच्या दोन्ही बाजूला काळे पाषाण असून, तीस फूट खोल आहे. नदीचे पात्रदेखील वीस- पंचवीस फूट खोल आहे. नदीपलीकडे जाण्यासाठी महिलांची कसरत ठरलेली असते. दररोज जगणे-मरण्याचा संघर्ष महिलांचा पाण्याच्या निमित्ताने ठरलेला आहे. बल्लीवरून पाय सरकल्यास थेट खोल नदीत पडण्याची शक्यता असते. अनेक ग्रामस्थ नदीत कोसळले आहेत.

हेही वाचा: नाशिक : शहरात स्वतःसह इतरांच्‍या जिवाशी खेळ सुरू

नदीच्या बाजूला शेती तरीही पावसाच्या भरवशावर पिके

सागाच्या बल्लीवरून विद्यार्थी हरसूल, पेठ आदी भागात शिक्षणासाठी जातात. वस्तीकडे येण्यासाठी सावरपाडा-शेंद्रीपाडा रस्ता व्हावा, अशी मागणी आदिवासींची आहे. सावरपाडापासून हरसूलला जाण्यासाठी चाळीस रुपये लागतात. हा रस्ता झाल्यास वीस रुपये भाडे पुरेसे ठरणार आहे. परिसरातील इतर नद्यांवर पूल बांधले गेले आहेत. मात्र तासवर पूल न झाल्याने दुष्काळातील तेरावा महिना दूर व्हायला तयार नाही.
नदीच्या बाजूला शेती करत असलो तरी वीज नसल्याने पाण्याचे इंजिन लावणे परवडत नाही. पावसाच्या भरवशावर पिके घ्यावी लागतात. वीजजोडणी झाल्यास बारमाही पिके घेता येतील, असे भगवान खोटरे यांनी म्हटले आहे.

''शेती करण्यासाठी अनेक वस्त्या गावापासून दूर नदीच्या बाजूला वसल्या आहेत. या वस्त्यांवर आम्ही वर्षभर राहातो. आमच्या वस्तीवरील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी नदीवरील सागाच्या बाल्लीवरून प्रवास करावा लागतो. ही समस्या दूर करण्यासाठी नदीवर लोखंडी पूल व्हावा.'' - अमृत राऊत (ग्रामस्थ)

हेही वाचा: लव जिहाद प्रकरणी गुन्हा दाखल करा; नाशिकमध्ये भाजप, हिंदू संघटना आक्रमक

''वस्तीच्या परिसरात वन्य प्राण्यांचा नेहमी वावर असतो. बाजार करण्यासाठी आम्हाला हरसूलमध्ये जावे लागते. वस्तीपासून शेंद्रीपाडा रस्ता तयार झाल्यास शाळेत जाण्यासोबत रुग्णांना दवाखान्यात नेण्याची सोय होईल.'' - गोपाल निंबारे (ग्रामस्थ)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top