अतिदुर्गम भागातील आदिवासींची सरकारला आर्त हाक; निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tribals

अतिदुर्गम भागातील आदिवासींची सरकारला आर्त हाक; निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय

बोरगाव, ता. सुरगाणा : सरकारनं सांगलं तसं आमी बी घराघरालं झेंड लावलंत. आता आमचंकडे बी जरा लक्ष देजोस सरकार..
एकीकडे भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात झाला. अतिदुर्गम भागात हर घर झेंडा फडकवला गेला; पण अजूनही अतिदुर्गम भागातील आदिवासी समाज मूलभूत सोयी-सुविधांसाठी संघर्ष करावा आहे. आरोग्य, शिक्षण, पूल, वीज, पाणी या समस्यांसाठी झगडावे लागत आहे. या आदिवासी बोलीतील शब्द बरेच काही सांगून जातात...

आमची कामां मंजूर केली नाय.. तर येणाऱ्या चुटणीत (निवडणुकीत) मतदान नाय करजन... आमचं पाड्यावर मत मागायलं येवांच नाय... आलस तर ठेमकं घेण ऊठू... आमची पिढी बरबाद झाली; पण आतापावेतो सुधारणा काहीच झाली नाय... ताहा आता आमी डवरां अन बांडगाही ठरवलांय का आमची पुरी कामा मंजूर नाय झाली त येणाऱ्या निवडणुकीत मत नाय टाकजन...आमचे चार- पाच पाड्यांवर कनचाही पुढारी व पक्ष येतील तर त्याहल उभा राहू देजन नाय..आम्ही पाणी पन पियालं दयाव नाय... जे येतील तेही कशाक काय करतील त्याचा तपास नाय... आम्ही त्याहलं टेमक्याखल लगावत न्यांव... मग तुम्ही आम्हांल सांगसाल.. कशाज ह्यां केलां...पुढा-यांनी आमची कामा नाय केली ताहा आम्ही ठेमकं घेणं उठू...
या आहेत अस्सल आदिवासी कोकणी, डांगी बोली भाषेतील आदिवासी बांधवांच्या तोडूंन निघालेल्या तहसील कार्यालयात विविध प्रकारच्या समस्यांबाबत निवेदन सादर करतांना उमटलेल्या संतप्त प्रतिक्रिया... हे आदिवासी बोल बरेच काही सांगून जातात.

हेही वाचा: इंग्रजी शाळांत आदिवासी विद्यार्थ्यांना दुय्यम वागणूक

शुक्रवारी (ता. १९) गुजरात बलसाड,धरमपूर सीमेलगतच्या खिरपाडा खो, वांगण खो, सागपाडा, वडपाडा, कहांडोळपाडा खो,खोबळा दिगर या पाड्यावरील ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन दिले, त्यात आम्हाला वेळोवेळी गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने महाराष्ट्र आणि गुजरात सीमेलगतच्या पार नदीवर पूल गरजेचा आहे. नदीच्या पलीकडे गुजरात राज्यात टोकलपाडा, बोरपाडा,भितरुंड, मोहाची माळी,पाचविहरा ही धरमपूर तालुक्यातील गावे आहेत. या गावापर्यंत गुजरात सरकारने पक्की सडक, आरोग्य, वीज,पिण्याचे शुद्ध पाणी,शिक्षण या मुलभूत गरजा आदिवासींना पुरवल्या आहेत. मात्र राज्यातील पाच ते सात पाड्यावरील दोन ते अडीच हजार आदिवासी बांधव अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचितच आहेत. नदीपलीकडे कोणाचा मृत्यू झालाच तर नदीवर पूल नसल्यामुळे जाता येत नाही. पावसाळ्यात खूपच हाल होतात. किराणा घेण्यासाठी जीव धोक्यात घालून पोहत जावे लागते.

हेही वाचा: आदिवासी मुलांच्या क्रांतिकारकांची वेशभूषा लक्षवेधी


शासनाने खिरपाडा ते पाचविहिरा नवीन पूल बांधावा, भेनशेत ते खिरपाडा खो हा १४ किमी रस्त्याचे डांबरीकरण करावे, थ्री फेज वीजपुरवठा सुरळीत करावा, खोबळा दिगर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावे, नार-पार नदीवर केटिवेअर सिंमेट बधारे बांधावा, दुर्गम भागात रुग्णवाहिका मंजूर करावी, एसटी सुरु करावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात रमण गोबाले, काळू काळाईत, भाऊराव सानवणे, रघू इजल, गुलाब दोडके, पंडित दोडके, चिंतामण इजल, रमेश तुरे, विजय दोडके, केशव जोगारे, गणपत धाडर, महादु इजल, सुरेश मोहडकर, चंदर काळाईत आदींचा समावेश होता.

Web Title: Tribes In Nashik District Demands Facilities From Maharashtra Government In Remote Areas

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikTribal Areastribals