esakal | Mahashivratri 2020 : त्र्यंबकेश्‍वर शिवमंदिरातील गर्भागृहात प्रवेशाचा तिढा मिटला..असा झाला निर्णय..
sakal

बोलून बातमी शोधा

Trimbakeshwar_nj.jpg

त्र्यंबकेश्‍वर येथील शिवमंदिरात महाशिवरात्रीला मोठी गर्दी होते. दर वर्षी शिवभाविकांच्या गर्दीत सातत्याने वाढ होत आहे. साहजिकच वाढत्या गर्दीचे नियंत्रण पोलिसांसाठी डोकेदुखी ठरते. त्यातून गर्दी नियंत्रणाच्या मुद्यावरून पोलिसांनी यंदा मंदिराच्या गर्भगृहात प्रवेशासाठी भाविकांना महाशिवरात्रीच्या दिवशी तरी प्रतिबंध करावा, अशी मागणी केली. दूरदूरहून येणाऱ्या भाविकांना दर्शनाविना परतावे लागण्याची भीती असल्याने सुरवातीला त्या विरोधात नाराजी होती. मात्र आता हा तिढा सुटला आहे.

Mahashivratri 2020 : त्र्यंबकेश्‍वर शिवमंदिरातील गर्भागृहात प्रवेशाचा तिढा मिटला..असा झाला निर्णय..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारामुळे महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्‍वर येथील शिवमंदिरातील गर्भागृहात प्रवेशाचा तिढा मिटला आहे. पोलिसांचा प्रस्ताव नाकारत जिल्हाधिकाऱ्यांनी भाविकांना गर्भगृहात प्रवेशाचा पायंडा कायम ठेवण्यास सहमती दर्शविली असली तरी देवस्थानने मात्र बुधवारी (ता. 19) सायंकाळी उशिरा झालेल्या बैठकीत गर्दीत अप्रिय घटना टाळण्यासाठी गर्भगृहात प्रवेश न देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे यंदापासून महाशिवरात्रीला गर्भगृहात भाविकांना प्रवेश नसेल, हे स्पष्ट झाले. 

ट्रस्टच्या बैठकीत निर्णय; पोलिस प्रशासनाच्या मागणीला प्रतिसाद 

त्र्यंबकेश्‍वर येथील शिवमंदिरात महाशिवरात्रीला मोठी गर्दी होते. दर वर्षी शिवभाविकांच्या गर्दीत सातत्याने वाढ होत आहे. साहजिकच वाढत्या गर्दीचे नियंत्रण पोलिसांसाठी डोकेदुखी ठरते. त्यातून गर्दी नियंत्रणाच्या मुद्यावरून पोलिसांनी यंदा मंदिराच्या गर्भगृहात प्रवेशासाठी भाविकांना महाशिवरात्रीच्या दिवशी तरी प्रतिबंध करावा, अशी मागणी केली. दूरदूरहून येणाऱ्या भाविकांना दर्शनाविना परतावे लागण्याची भीती असल्याने सुरवातीला त्या विरोधात नाराजी होती. मात्र आता हा तिढा सुटला आहे. ग्रामीण पोलिसांच्या आवाहानाला प्रतिसाद देत देवस्थानने गर्भगृहातील प्रवेशबंदीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदापासून मंदिरातील गर्भगृहात जाऊन भाविकांना दर्शन घेता येणार नाही. 

ट्रस्टची माघार 
या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्यांचा कालावधी लक्षात घेता गर्भगृहातील गर्दी व भाविकांच्या गैरसोयीचा विचार करून प्रवेशावर नियंत्रण ठेवावे. स्थानिक पोलिसांशी समन्वय ठेवून मंदिर परिसरातील गर्दीवरही योग्य ते नियंत्रण ठेवावे, अशा सूचना ट्रस्टला दिल्या. तर जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी यांना आपत्ती व्यवस्थापन कायदांतर्गत अधिकार प्रदान करीत श्री संत निवृत्तिनाथ महाराज यात्रेप्रमाणे ट्रस्टशी समन्वय ठेवून गर्दीचे नियंत्रण करण्याच्या सूचना देत गर्भगृहातील प्रवेश कायम ठेवण्यास सहमती दर्शविली. मात्र त्यानंतर सायंकाळी देवस्थानच्या विश्‍वस्तांनी बैठक घेत गर्भगृहात प्रवेश न देण्याची पोलिसांची विनंती मान्य केली. 

हेही वाचा > सुनेला वाचविण्यासाठी 'ते' पुढे सरसावले!...तर मुलाने त्यांनाच

सूचना ट्रस्टला आणि पोलिस विभागाला
श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गर्भगृहात प्रवेशबंद करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने कोणतेही आदेश दिलेले नाहीत. सुट्यांचा कालावधी लक्षात घेता गर्भगृहात होणारी गर्दी व त्यामुळे भाविकांची होणारी गैरसोय विचारात घेता या प्रवेशावर नियंत्रण ठेवावे. स्थानिक पोलिसांशी समन्वय ठेवून मंदिर परिसरातील गर्दीवरही योग्य ते नियंत्रण ठेवावे, अशा सूचना ट्रस्टला आणि पोलिस विभागाला दिल्या आहेत. नागरिकांनी या संदर्भात ट्रस्ट व प्रशासनास सहकार्य करावे. - सूरज मांढरे, जिल्हाधिकारी  

हेही वाचा > बेपत्ता बांधकाम अभियंत्याचा मृतदेह गांधी तलावात!