Latest Marathi News | ओझरला भाईगिरी करणाऱ्यांना खाकीचा 'प्रसाद' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police News

Crime Update : ओझरला भाईगिरी करणाऱ्यांना खाकीचा 'प्रसाद'

ओझर (जि. नाशिक) : गाडीला कट मारण्यावरून दोघांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसान दोन गटात होत असवाना ओझरखाकी वर्दीला कुणकुण लागताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी टोळभैरवांना 'प्रसाद' देत स्वतःला भाई म्हणून मिरविणार्‍यांची यावेळी पळता भुई थोडी केली. (two groups clashes over car overtaking police solved case nashik crime news)

ओझर शहर व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून रोडरोमिओ व भाईगिरी, बाजारात पाकिटमारीच्या घटनांनी उच्छाद मांडला आहे. सायंकाळच्या सुमारास शहरातील मुख्य रस्त्यावरून धूमस्टाइलने गाडी चालविणे, पोलिसांच्या गाडीचा सायरन वाजवित फिरणे, जाणीवपूर्वक कट मारून खोड काढणे व त्यावर वाद करीत आपली भाईगिरीची दहशत वाढविणे असे समाजघातक प्रकार नेहमीच होत आहेत.

शाळा-महाविद्यालयीन मार्गावर या टारगट व भाईगिरी करणाऱ्यांचा कायमच राबता असतो. या कायम चालणाऱ्या प्रकारांबाबत नागरिकांच्या मागणीनंतर आता पोलिस यंत्रणा अॅक्शन मोडवर आली आहे. या भाईगिरीच्या चापामुळे आता हळूहळू सिद्ध होत आहे. रविवारी येथील सायखेडा फाट्यावरील शिवाजी महाराज चौकात गाडीला कट मारल्याच्या क्षुल्लक कारणाने दोन जणांमध्ये वाद झाले. दोन्ही चालकांनी आपल्या समर्थकांना फोन केले.

हेही वाचा: महिलांनो दागिने सांभाळा; सोनसाखळी चोरट्यांकडून धोका

बघता बघता पाठिराखे घटनास्थळी जमा झाले. काही समजायच्या आतच हे दोन गट हमरीतुमरीवर येत एकमेकांना शिविगाळ करून भिडू लागले. तोबा गर्दी झाल्याने याचा परिणाम वाहतुकीवर होत वाहतूकदेखील खोळंबली होती. दरम्यान काहींनी पोलिसांना घटना कळविली. ओझरचे पोलिस उपनिरीक्षक अहिरे, गुन्हे शोध पथकाचे दीपक गुंजाळ, अनुपम जाधव, किशोर अहिरराव, राजेंद्र डंबाळे यांनी घटनास्थळी धाव घेत भाईंना व त्यांच्या पाठिराख्यांना खाकी वर्दीचा चांगलाच 'प्रसाद' दिला. स्वयंघोषित भाईंना पळता भुई थोडी झाली.

भविष्यातील धोके ओळखा

ओझरच्या काही नगरांतून पोलिसांनी तलवार, चाकूसारखी तीक्ष्ण हत्यारे मध्यंतरी जप्त करत गुन्हे दाखल केले होते. गुन्हे दाखल केलेल्यांबाबत राजकीय हस्तक्षेप होत असल्याने पोलिसांनादेखील कारवाईसाठी मर्यादा येतात, त्यामुळे त्यांना अभय मिळू शकते परंतु असेच चालत राहिल्यास एखाद्या छोट्या घटनेतून भविष्यात मोठी घटनाही घडू शकते हे नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी दक्ष राहण्याची गरज आहे अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा: भगर उठली जीवावर; खाल्ल्याने अनेकांना विषबाधा