Nashik : महापौरपदाची द्विवार्षिक पूर्ती; दोन वर्षांत शहर समृद्धीच्या वाटेवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nashik mayor
महापौरपदाची द्विवार्षिक पूर्ती; दोन वर्षांत शहर समृद्धीच्या वाटेवर

महापौरपदाची द्विवार्षिक पूर्ती; दोन वर्षांत शहर समृद्धीच्या वाटेवर

नाशिक : दोन वर्षांपूर्वी शहराचा प्रथम नागरिक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्याचवेळी न भूतो असे काम करण्याचा निश्‍चय केला. द्विवार्षिक पूर्ती होत असताना शब्दाला जागल्याचे मनोमन समाधान वाटते. शहर समृद्धीच्या वाटेवर आणल्याचा सार्थ अभिमान आहे. मागील २५ वर्षात न सुटलेले प्रश्‍न सोडविल्याने न भूतो असे काम माझ्या कारकिर्दीत झाले. महापौर म्हणून सक्षम नेतृत्व केलेच तेवढ्याच ताकदीने कामेदेखील केली. ‘रामायण’ बंगल्यावर बसण्यापुरता महापौर झालो नाही, कोरोनाकाळातही लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या अडीअडचणी सोडविल्या.

हेही वाचा: Repeal Three Farm Laws : अखेर नरेंद्र मोदी नमले

गेल्या पंचवीस वर्षांपासून नगरसेवक असलेल्या सतीश कुलकर्णी यांच्या महापौरपदाच्या कारकिर्दीला दोन वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ शी संवाद साधताना ते बोलत होते. शहरात पंचवीस वर्षांपासून अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. त्यातील महत्त्वाचे प्रश्‍न माझ्या कारकिर्दीत सोडविले. महापालिकेच्या करोडो रुपयांच्या मिळकतींची दुर्दशा झाली, त्या मिळकती बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर विकसित करण्याचा निर्णय घेतला. बीओटीमुळे २२ हजार लोकांना रोजगार तर मिळेलच, त्याशिवाय महापालिकेला एक रुपया खर्च न करता दोन विभागीय कार्यालय, एक रुग्णालय व तीन बहुमजली वाहनतळ बांधून मिळणार आहे. या व्यतिरिक्त ११०- १२५ कोटी रुपयांचे उत्पन्नदेखील मिळेल. आयटी हब, लॉजिस्टिक पार्क, यांत्रिकी झाडूच्या साहाय्याने रिंगरोडची स्वच्छता, गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रातून नाशिक रोड भागात पाणीपुरवठा योजना, दादासाहेब फाळके स्मारकाला पूर्ववैभव प्राप्त करून देण्यासाठी विशेष योजना, महापुरुषांच्या पुतळ्यांची उभारणी, फायर ब्रिगेडच्या ताफ्यात नवीन वाहने, शहरात वीस ठिकाणी इलेक्ट्रीक वाहनांसाठी बॅटरी चार्जिंग स्टेशन, मुस्लिम धर्मियांच्या कब्रस्तानासाठी जागा, विद्युतदाहिनी आदी महत्त्वाच्या कामे प्रलंबित कामे मार्गी लावल्याने शहर खऱ्या अर्थाने समृद्धीच्या वाटेवर असल्याचा अभिमान असल्याचे महापौर कुलकर्णी म्हणाले. गोदावरी व उपनद्यांच्या विकासासाठी नमामि गोदा प्रकल्प केंद्र सरकारच्या मदतीने मार्गी लागला. सविस्तर प्रकल्प अहवाल सादर झाला असून, लवकरच निधी प्राप्त होऊन गोदावरी व उपनद्यांची समस्या कायमस्वरूपी सोडविली जाणार असल्याचे महापौर म्हणाले. कोरोनाकाळात रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी जनजागृती, सव्वातीन लाख विद्यार्थ्यांना जलनेती पुस्तकाचे वाटप केले.

हेही वाचा: अग्रलेख : चित्ती असू द्यावे वित्तभान!

विकास हाच निवडणुकीत मुद्दा

महापालिकेमार्फत शहर विकास करतानाच केंद्र सरकारच्या मार्फतही नाशिकला भरभरून मिळाले. भारतमाला योजनेंतर्गत द्वारका ते नाशिक रोड दरम्यान डबलडेकर उड्डाणपुलाची निर्मिती, समृद्धी महामार्ग व या महामार्गाला लागून बुलेट ट्रेनचा प्रस्ताव, समृद्धी महामार्गाकडे नाशिकहून जाण्यासाठी महामार्ग विस्तारीकरण, सूरत- चेन्नई ग्रीन फिल्डचा नाशिक जिल्ह्यातून १२२ किलोमीटरचा प्रवास, ग्रीन फिल्ड महामार्गावर आडगाव येथे तयार होणारे बिझनेस सेंटर, शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी टायरबेस मेट्रो निओ प्रकल्पासाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात केलेली निधीची तरतूद, केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत ओझर विमानतळावरून सुरू झालेली देशांतर्गत विमानसेवा, नमा गंगेच्या धर्तीवर नमामि गोदा प्रकल्प, नाशिक- पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी निधीची तरतूद यासारख्या महत्वकांक्षी प्रकल्पांचा उल्लेख करता येईल. केंद्र सरकारमार्फत नाशिकला एवढे भरभरून प्रथमतः मिळाले. त्यामुळे आम्ही केलेली कामे व केंद्र सरकारने नाशिकसाठी दिलेले योगदान या आधारे आगामी महापालिका निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर नाशिककरांसमोर आम्ही जाणार असल्याचे महापौर कुलकर्णी यांनी सांगितले.

हेही वाचा: नागपूरकर अनुभवणार भाजपविरुद्ध ‘स्वयंसेवक’ अशी लढत

दोन वर्षांत केलेली महत्त्वाची कामे

  • वाहतूकसेवा पुरविण्यासाठी शहर बससेवा

  • रस्ते दुरुस्तीसाठी अडीचशे कोटींची तरतूद

  • पर्यावरण दिनापासून नंदिनी नदी संवर्धन अभियान

  • महापालिकेमार्फत अकराशे बेडचे दोन रुग्णालय

  • तक्रार निवारणास ‘माझा महापौर’ ॲप निर्मिती

  • प्रभाग समस्‍या सोडविण्यासाठी महापौर आपल्या प्रभागात उपक्रम

  • शहरातील ३०० उद्यानांची देखभाल

  • गोदा तीरावर धार्मिक विधीसाठी शेड

loading image
go to top