Kamagar Kalyan Natya Spardha : पुन:प्राप्तीची रंजक कहाणी ‘उदकशांत’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

A scene from the play 'Udakshant'. AT PA. SA. Natyagruha

Kamagar Kalyan Natya Spardha : पुन:प्राप्तीची रंजक कहाणी ‘उदकशांत’

नाशिक : आयुष्यात उद्भवलेल्या परिस्थितीतून वेगळी वाट काढण्यासाठी अन् जे निघून गेले त्याच्या पुन:प्राप्तीसाठी प्रयत्न करताना जी मानसिकता निर्माण होते त्याचा पट मांडणारी नाट्यकृती ‘उदकशांत’. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ६८ व्या नाट्यस्पर्धेत शुक्रवारी (ता. २०) कामगार कल्याण केंद्र, एकलहरेतर्फे हे नाटक सादर झाले. समीर मोने लिखित नाटकाचे दिग्दर्शन सचिन रहाणे यांनी केले. (udakashanta marathi drama performance in Kamgar Kalyan Natya Spardha nashik news)

मनुष्याच्या मृत्यूनंतर उद्भवलेल्या स्थितीत बदल व्हावा म्हणून केला जाणार महत्त्वपूर्ण विधी म्हणजे उदकशांत. या नाटकाचे कथानक एका अतिसामान्य कुटुंबात जन्म घेणाऱ्या मतिमंद मुलाभोवती फिरते. त्याच्या जाण्याने त्याच्या आई- वडिलांना होणारा त्रास, त्याची अवहेलना यातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

उदकशांत हा विधी धार्मिक विधी स्वरूपात न करता माणूस स्वतःच्या फायद्यासाठी आणि आपल्या मार्गाने करू लागला तर काय होते हे या नाटकातून दाखविण्यात आले आहे. जिवंत व्यक्तीचं आयुष्य सुखकर जावे यासाठी केलेली शांततेची तडजोड एखाद्याच्या मनावर काय परिणाम करू शकते याची रंजक कहाणी प्रेक्षकांसमोर उभी राहते.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

हेही वाचा: Subhash Avchat | कोणतेही लिखाण ठरवून लिहिले नाही : सुभाष अवचट

हर्षल भट, शब्दजा वेलदोडे- देशपांडे, सचिन रहाणे, दीपक चव्हाण, भावना कुलकर्णी, अथर्व देव या कलावंतांनी या नाटकात भूमिका साकारल्या. सचिन रहाणे, दीपक चव्हाण यांनी नेपथ्य, तर विनोद राठोड यांनी प्रकाशयोजना साकारली. प्रणील तिवडे यांनी नाटकाला पार्श्वसंगीत दिले. प्रबुद्ध माघाडे यांनी वेशभूषा, तर हर्षल भट, प्रतीक्षा ठाकूर यांनी रंगभूषा साकारली. विनय कटारे, नीलेश सोनार, महेश शिरसाट, गौरव ढोकळे, निषाद जोशी यांनी रंगमंच व्यवस्था साकारली. रविकांत शार्दूल (कविवर्य नारायण सुर्वे सार्व. वाचनालय, नाशिक) यांनी निर्मिती प्रमुख काम पाहिले.

उद्या ‘चेटूकवारं’ नाटक

शनिवारी (ता. २१) नाटकाचे सादरीकरण होणार नाही, अशी माहिती स्पर्धेच्या समन्वयकांनी दिली आहे. दरम्यान, रविवारी (ता. २२) ललित कलाभवन सिडको, नाशिकतर्फे 'चेटूकवारं' हे नाटक सादर होणार आहे. प्रा. दिलीप जगताप या नाटकाचे लेखक असून राजेश टाकेकर दिग्दर्शक आहेत.

हेही वाचा: Nashik Graduate Constituency : "तांबे पिता-पुत्राने थोरातांना अडचणीत आणलं" ; राष्ट्रवादीच्या नेत्याचं वक्तव्य