राज-उद्धव काँग्रेसची ‘सी टीम’
---
ॲड. गुणरत्न सदावर्ते ः शेतकरी, कष्टकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३ : अरविंद केजरीवाल यांच्या मुशीत तयार झालेला अभिजित दीपके हा काँग्रेसची ‘ए टीम’ आहे; तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे काँग्रेस पक्षाची ‘सी टीम’ म्हणून काम करीत आहेत. निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांविरोधात आंदोलन करण्यापेक्षा शेतकरी, कष्टकरी यांच्या समस्यांकडे ठाकरे बंधूंनी लक्ष द्यावे, अशी टीका ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी शनिवारी (ता. ३) पत्रकार परिषदेत केली.
ॲड. सदावर्ते म्हणाले, की काँग्रेसच्या ‘टीम बी’मध्ये पाहुणे कलाकार असून, खासदार सुप्रिया सुळे या कधी इकडे राहतात, कधी तिकडे जातात. राज ठाकरे यांना संविधानाची भाषा आणि मर्यादा कळत नाहीत. निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेसकडून राजकीय अजेंडा चालवत मोर्चे काढण्याची भाषा केली जात आहे. भायखळा येथून निघणाऱ्या मोर्चातून राज ठाकरेंनी काढता पाय घेतला, कारण मुंबईत कायदा आणि न्यायालयाच्या मर्यादांचे उल्लंघन केल्यास काय परिणाम होतात, याची जाणीव त्यांना झाली. संविधानाची जाण नसताना केवळ पोलो खेळणे आणि रिकामे ग्लास भरणे याने शहाणपण येत नाही, असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला.
राहुल गांधी यांच्या इशाऱ्यावर उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि इतर विरोधक काम करीत आहेत. सोशल मीडिया सांभाळणारी दीपके याच्यासह तरुणांची टीम ही काँग्रेसची ‘ए टीम’ असून, राज आणि उद्धव ठाकरे हे काँग्रेसची ‘सी टीम’ म्हणून मैदानात उतरले आहेत. सुप्रिया सुळे या माझ्या बहिणीसारख्या आहेत; त्यांच्याशी व्यक्तिगत वैर नसून, आमचे मतभेद केवळ धोरणांवर आहेत.
आम्ही सत्ताधारी, भाजपच्या मंत्र्यांवर टीका करीत नसल्याचे आरोप चुकीचे आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासारख्या नेत्यांवरही वेळोवेळी थेट आणि परखड शब्दांत प्रहार केला असल्याचे सांगत, आम्ही जे बोलतो ते ठोकून बोलतो, असे सदावर्ते म्हणाले.
इन्फो
एकनाथ शिंदेंना शरद पवार व्हायचंय
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजकारणात शरद पवार यांची जागा घेऊ पाहत आहेत. त्यांना पवारांची कॉपी करायची आहे. मात्र, एकनाथ शिंदेसाहेब, तुम्ही कधीही शरद पवार होऊ शकत नाही आणि त्यांची ‘ट्रू कॉपी’ तर अजिबात होऊ शकत नाही. शरद पवारांनी नामांतराचे राजकारण करीत दीर्घकाळ मराठा समाज एकवटून ठेवला होता. कोणाच्या तरी सांगण्यावरून माणसे सोबत घेऊन कार्यक्रम उरकल्याने कोणी पवार होत नाही, अशी टीका ॲड. सदावर्ते यांनी केली.