esakal | अज्ञात समाज कंटकाकडून शेतपिकावर घाव; शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

brinjal farm.jpg

पोटच्या मुलाप्रमाणे वाढविलेल्या शेतपिकाचे अंधाराचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीकडून नुकसान. शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान. कधीही पोलिस स्टेशनचे तोंडही न बघितलेल्या शेतकऱ्यांचा मात्र तक्रार देण्यास नकार. वाचा नेमके काय घडले?

अज्ञात समाज कंटकाकडून शेतपिकावर घाव; शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान

sakal_logo
By
ज्ञानेश्वर गुळवे

नाशिक : (अस्वली स्टेशन) पोटच्या मुलाप्रमाणे वाढविलेल्या शेतपिकाचे अंधाराचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीकडून नुकसान. शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान. कधीही पोलिस स्टेशनचे तोंडही न बघितलेल्या शेतकऱ्यांचा मात्र तक्रार देण्यास नकार. वाचा नेमके काय घडले?

अंधारात साधला डाव...

इगतपुरी तालुक्यातील माणिकखांब येथील माधव आडोळे यांच्या एक एकरावरील संपूर्ण वांगे पीक कुणीतरी अज्ञात ईसमाने शनिवारी (ता. 25) रात्री कोयत्याच्या सहाय्याने तोडून नष्ट केले. वांग्यास चांगला बाजारभाव असल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे  वांगे पिकास नुकतीच फळ आले होते. बाजारात वांगे पिकाला चांगला बाजार भाव असल्याने त्यांनी यंदा आपल्या गट नंबर ३७८ मध्ये पंचगंगा जातीच्या वाणाची लागवड केली होती. शेतात मल्चिंग पेपर करून ड्रिप पद्धतीने त्यांनी चाळीस-पन्नास हजारावर लागवड खर्च करुन जोरदार पावसात पोटच्या मुलाप्रमाणे जपत जोमदार वांगे पीक बनविली होती. मात्र कुणीतरी पूर्व वैमनस्यातून आडोळे यांच्या शेतातील उभ्या वांगे पीकावर रात्री अंधाराचा फायदा घेत कोयत्याच्या सहाय्याने संपूर्ण एकरावरील पिकाचे नुकसान केले आहे. दुसऱ्या दिवशी शेतात गेल्यानंतर बघितले असता वांग्याचे झाडे तुटलेल्या अवस्थेत अस्ताव्यस्त पडलेली कोमेजून सुकलेल्या अवस्थेत असल्याचे बघून आडोळे हतबल झाले. 

एक लाख रूपयांचे नुकसान

कधी कोर्ट अन् पोलीस स्टेशनची पायरीही न चढलेल्या आडोळे यांनी पोलिसांकडे तक्रार देण्यास नकार दिला आहे. सुमारे एक लाख रूपयांचे नुकसान झाल्यामुळे इतर शेतकरीदेखील आडोळे यांना आधार देत आहेत. दरम्यान आज तालुका कृषी अधिकारी तसेच घोटी पोलिसांनी शेतावर येऊन पिकाचा पंचनामा केला. त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी खंबाळे, मुंढेगाव, माणिकखांब तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा > तीन दिवसांपासून शोधाशोध; आणि तपास लागला १५० फूट खोल गाळात!

काबाड कष्ट करुन हजारों रुपये लागवड खर्च केला. केवळ दोन पैसे हाती येतील या आशेने पोटच्या मुलाप्रमाणे वांगे पीकाची काळजी घेऊन उत्तम प्रतीचे पीक उभे केले होते. मात्र अज्ञात इसमांनी फळधारणा झालेल्या एका एकरावरील संपूर्ण वांग्याचे उच्च प्रतीचे पीक कोयत्याने तोडून नष्ट केले आहे. - माधव आडोळे, वांगे उत्पादक शेतकरी.

शेतकरी माधव किसन आडोळे यांच्या एक एकर वांग्याच्या शेतीचे नुकसान झाले आहे. त्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले असून नुकसान भरपाई मिळावी. सोबतच त्या अज्ञात व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
 - हरीष चव्हाण. सरपंच माणिकखांब.

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

संपादन - किशोरी वाघ

loading image
go to top