esakal | Unlock Nashik ; लग्न सोहळ्यात रुखवत नसल्याने इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना ‘सेट बॅक
sakal

बोलून बातमी शोधा

unlock nashik

कोरोनाने फ्रीज अन्‌ पावसाळ्याने वॉशिंग मशिनला दिला हात

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : कोरोना (corona virus test) चाचण्या आणि उपचाराने इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या (electronic gadgets) मार्केटमध्ये फ्रीज विक्रीला मदत झाली आहे. त्याचबरोबर पावसात कपडे ओलसर राहून दमट वास येऊ नये म्हणून वॉशिंग मशिनच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. ‘अनलॉक नाशिक’मध्ये बाजारपेठा खुल्या झाल्यानंतर आर्थिकदृष्ट्या हे बदल दिसत असले, तरीही लग्नसराईमध्ये वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीवर मर्यादा आल्याने बहुतांश कुटुंबांनी रुखवत न मांडणे पसंत केले आहे. परिणामी, इलेक्ट्रॉनिक्स गृहोपयोगी वस्तूंच्या विक्रीला ‘सेट बॅक’ बसला. सद्य:स्थितीत खिशाला परवडतील, अशा किमतीमध्ये वस्तू खरेदी केल्या जात असल्याने ‘इकॉनॉमी मॉडेल’ची चलती पाहायला मिळत आहे. (Unlock-Nashik-Moving- economy-model-nashik-marathi-news)

कोरोनाने फ्रीज अन्‌ पावसाळ्याने वॉशिंग मशिनला दिला हात

लॉकडाउनमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्री व्यवस्थेला फटका बसला. त्यानंतर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वस्तूंच्या किमती कंपन्यांकडून कमी होईल, अशी अटकळ होती. प्रत्यक्षात कंपन्यांनी वस्तूंच्या किमतीत २५ ते ३० टक्क्यांनी वाढ केली. आयात शुल्कामध्ये झालेली वाढही त्यास कारणीभूत ठरू शकते, असे दुकानदारांचे म्हणणे आहे. सध्या मागणी असलेल्या वस्तूंमध्ये ३२ आणि ४३ इंची एलईडी दूरचित्रवाहिनी संच, सिंगल डोअर फ्रीज, वॉशिंग मशिनचा समावेश आहे. दूरचित्रवाहिनी संचामध्ये स्मार्ट अँड्राइड प्रणालीचा वापर करून गुगलच्या माध्यमातून आवाजावर नाशिकचे तापमान, नाशिकमधील कोरोना रुग्णांची संख्येची माहिती मिळवता येते. बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या २२, २४, ३२, ४३, ५० पासून ७५ ते ८५ इंची दूरचित्रवाहिनी संचाची किंमत दहा हजारांपासून १४ लाखांपर्यंत आहे. त्याचबरोबर ऑर्गिनिक एलईडी दूरचित्रवाहिनी संच नव्याने बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. कमी आकाराच्या संचावर छानसे चित्र आणि आवाजासाठी विकले जाणारे हे संच ५५ आणि ६५ इंची आकारात उपलब्ध आहेत. त्याच्या किमती दीड लाखापासून चार लाखांपर्यंत आहे.

डबल डोअर फ्रीजची विक्री कमी

फ्रीजमध्ये डिजिटल पद्धतीने अंतर्गत तापमान कमी-अधिक होणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. तरीही किमतीमुळे डबल डोअर फ्रीजला फारशी मागणी नाही. लॉकडाउनमध्ये नाशवंत माल ठेवण्यासाठी म्हणून ग्राहक, तर वैद्यक क्षेत्रासाठी सिंगल डोअर फ्रीजला पसंती मिळत आहे. दरम्यान, कोरोना संसर्गामध्ये आता रोजच्या रोज घरच्या घरी कपडे धुतले जात असल्याने वॉशिंग मशिनला मागणी आहे. वॉशिंग मशिनमध्ये हीटर ‘इनबिल्ट’ असल्याने गरम पाण्यात कपडे धुण्याकडे कल वाढला आहे. चार सदस्यांच्या कुटुंबात तीन किलो क्षमतेची वॉशिंग मशिन वापरली जात होती. आता मात्र साडेसात ते आठ किलो क्षमतेची वॉशिंग मशिन विकत घेतली जात आहे.

२० कोटींचे कूलर-एसी पडून

उन्हाळ्यात लॉकडाउनच्या कडक निर्बंधामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कूलर आणि वातानुकूलित यंत्रांची विक्री झाली नाही. शहरातील दुकानदारांकडे जवळपास वीस कोटींच्या वस्तू पडून आहेत. आता या वस्तू परत करणार काय? या प्रश्‍नाला दुकानदारांनी नाही असे उत्तर दिले. कंपन्यांकडून या वस्तू परत घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दुकानात असलेल्या वस्तू ग्राहक येतील तसे विकण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: नाशिकमध्ये आता दुसरा 'मॅग्नाइट मॅन'!बघण्यासाठी गर्दी

लॉकडाउनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात इलेक्ट्रॉनिक्स गृहोपयोगी वस्तूंची मागणी चांगली राहिली. या आठवड्यात ग्राहकांचा चौकशीकडे अधिक कल आहे. लॉकडाउनमध्ये कंपन्यांकडून कमी मनुष्यबळात उत्पादन केले गेले. परिणामी, ग्राहकांकडून आता होत असलेल्या मागणीप्रमाणे वस्तू विक्रीसाठी उपलब्ध नाहीत. हेही कारण खरेदीकडे कमी झालेल्या कलाचे असू शकते. - शांताराम घंटे, अध्यक्ष, नाशिक जिल्हा इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन

लग्नसराईमध्ये रुखवतासाठी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी केल्या जात होत्या. पण आता कमी वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत लग्न सोहळा करावा लागतो. त्यामुळे वस्तू विकत घेतल्या जात नाहीत. तरीही पावसाळा, वैद्यकीय क्षेत्र आणि घरबसल्या मनोरंजन याची वस्तू खरेदीसाठी मदत होत आहे. - रवी पारख, नाशिक

बँक आणि विक्रेत्यांकडूनही इलेक्ट्रॉनिक्स वस्तूवर आकर्षक ऑफर मिळाली. त्यामुळे वस्तू घेणे शक्य झाले. गेल्या आठवड्यात ‘होम थिएटर’ खरेदी केले असून, विक्रेत्याकडून चांगली सर्व्हिस मिळाली. - प्रियांका बोरगावकर, गृहिणी

हेही वाचा: भीषण! एकमेकांवर आदळून नऊ वाहने अपघातग्रस्त