Yeola Water Scarcity : येवला शहराला 4 दिवसाआड पाणीपुरवठा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Depleted water storage in the storage pond at yeola

Yeola Water Scarcity : येवला शहराला 4 दिवसाआड पाणीपुरवठा!

येवला (जि. नाशिक) : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावातील पाणीसाठा खालावत असून अद्याप पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनाचा निर्णय न झाल्याने पाणी बचतीसाठी चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. (Water Scarcity Yeola city water supply every 4 days Nashik News)

पाटबंधारे विभाग पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनाने ५० दलघन फूट क्षमतेच्या शहर पाणी योजनेच्या साठवण तलावात संपूर्ण क्षमतेने भरून दिला. तरीही पालिका शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा करू शकत नाही.

पालिकेची पाणी वितरण व्यवस्था लाखो रुपये खर्च करूनही सक्षम झाली नसून अनेकदा आश्वासने मिळाल्याने किमान दररोज शुद्ध पाणी मिळेल अशी आशा होती. पालखेड प्रशासनाच्या बेजबाबदारपणाच्या कारभारामुळे दोन्ही साठवण तलावात पुरेसा पाणीसाठा देखील अनेकदा मिळत नसल्याचा अनुभव आहे.

मागील आवर्तनात तलाव पूर्ण क्षमतेने भरूनही सद्या साठवण तलावात केवळ पाच दलघन फूट पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे सोमवारपासून (ता. २) तीन ऐवजी शहरात चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. शहराला पिण्यासाठी रोज ५० लाख लिटर पाणी लागते, त्यामुळे आवर्तन मिळेपर्यंत पाणी पुरवावे लागणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

हेही वाचा: गतीशक्तीच्या बदलात Passenger झाली इतिहासजमा; नांदगावसह सर्वत्र सध्या ‘वंदे भारत’चा बोलबाला!

१० जानेवारीपर्यंत पालखेड पाणी आवर्तन येईल तोपर्यंत पाणी जपून वापरावे. शहरात नळांना पाणी आल्यानंतर पाण्याची नासाडी होणार नाही याबाबत देखील नागरिकांनी जागरूकता दाखवावी असे आवाहन मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी केले आहे.

मुळात पाणीप्रश्नी कोणीही गंभीरता दाखवत नसल्याने शहरावर टंचाईची संक्रांत ओढवते. साठवण तलावात पाणी मुबलक असूनही उपयोग नाही. शहरवासीयांना दररोज पाणी मिळावे यासाठी पाणी वितरण व्यवस्थेत संपूर्ण शहरात समांतर पाइपलाइन टाकावी लागेल. तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी झिरपते तर साठवण तलावाच्या लगतच्या सुमारे २०० विहिरींतून निरंतर चालू असलेला पाणी उपसा हा वर्षानुवर्षे चर्चेत असलेला प्रश्न कोणीही सोडवण्यास पुढे येत नाही.

आता जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पालखेड पाणी आवर्तनातून पूर्ण क्षमतेने साठवण तलाव भरून मिळेल पण त्यापुढे किमान ६० दिवस तरी शहराला पाणी पुरवण्याचे आव्हान पालिकेला पेलावे लागणार आहे.

हेही वाचा: सावित्रीच्या लेकींची रुपयावर बोळवण! 30 वर्षांपासून ZP शाळांत मुलींना दररोज 1 रुपयाच उपस्थिती भत्ता!

टॅग्स :NashikyeolaWater Scarcity