गावखेड्यातील कलाकारांना वेबसिरीजच व्यासपीठ | Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावखेड्यातील कलाकार

गावखेड्यातील कलाकारांना वेबसिरीजच व्यासपीठ

चांदोरी (जि. नाशिक) : ग्रामीण भागात ‘नटखट’ व्यक्तिरेखा असतात तशाच अंगात ‘शिनेमा’ घुसलेले काही ‘नट’ही असतात. अभिनयाचा बाज असूनही वाव मिळत नसलेल्या गावगाड्यातील अशा कलाकारांसाठी ‘वेबसिरीज’ एक चांगला प्लॅटफॉर्म ठरत चालला आहे. यातूनच ‘चांडाळ चौकडी’, ‘गावरान मेवा’, ‘झांगड गुत्ता’, ‘तुमच्यासाठी काय पण’, ‘लैला मजनू’, ‘चालू नवरा, खतरनाक बायको’ हे रसिकांची चांगलीच दाद मिळवत असल्याचे दिसून येत आहे.

गावगाड्यातील लोकही संगीत, कला यांच्या बाबतीत ‘दर्दी’ असतात. मनोरंजनाच्या दुनियेत प्रेक्षक म्हणून महत्त्वाचे स्थान असलेल्या या लोकांच्या अंगी कलागुणही ठासून भरलेले असतात. कोणी शब्दांची गुंफण करून गीताला आकार देण्यात, तर कोणी आपल्या कंठातून सूर आळवण्यात पटाईत असतो. कोणी वाद्यांमधून सुमधुर नाद निर्माण करतो, तर कोणी अभिनयात ‘वस्ताद’ असतो. मात्र, यांना संधी काही मिळतच नाही. यामुळे अंगात ओतप्रोत असलेली कला सादर होत नसल्याने अशा गुणिजनांच्या अंगातील कला नेहमी सळसळत राहते. यातूनच काही मायानगरीत पाऊल ठेवतात. तेथील स्पर्धा, एन्ट्री पॉइंट या मंडळींचा शिरकाव होऊ देत नाही.

मोठा संघर्ष करून त्यांना घराचा रस्ता पकडावा लागतो. गावठी तमाशा ते ‘टुरिंग टॉकीज’ आणि ‘नाटक ते सिरिअल’ असा मनोरंजनाच्या दुनियेचा प्रवास पाहिलेल्या दोन-चार पिढ्यांनाही काही वेगळा अनुभव मागच्या काही वर्षांत हा प्रवास ‘स्मार्ट’ होत प्रत्येकाच्या तळहातावर आला आहे. यातील ‘फोर जी’ तंत्रज्ञानाच्या दीड जीबीवर ताव मारला जात आहे. ही प्रगती ग्रामीण कलाकारांसाठी सुसंधी ठरली आहे.

त्यांच्यासाठी ‘वेबसिरीज’ हा पॅटर्न चांगलाच वाव देणारा ठरला आहे. यात ग्रामीण भागातील अनेकांनी गीतकार ते दिग्दर्शक म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करण्याबरोबरच विविध भूमिका साकारत आपल्या अंगातील ‘हीरो’ एका वेगळ्या रूपेरी पडद्यावर झळकला आहे. यामुळे विज्ञानाच्या प्रगतीचे काही तोटे असले तरी याचे निश्चितच अनेक फायदे असतात हे दर्शविले जात आहे.

कित्येक छोट्या छोट्या गोष्टींतून या वेबसिरीजने लोकांना आपल्याकडे वळवले व सध्याच्या ग्रामीण वास्तवाशी, तिथल्या प्रश्नांशी लोकांना एकरूप व्हायला लावले नि नकळत अंतर्मुखही व्हायला लावले. जगताना नुसते मनोरंजन कामाचे नसते तर कित्येक जाणिवा, वास्तव, अनुत्तरित प्रश्न समोर उभे ठाकलेले असतात. त्यातून मार्ग काढत पुढे जायचे असते हे या वेबसिरीजमधून आता मांडले जातेय.

हेही वाचा: Ashadhi Wari : रहीमच्या अंगणात रामाचा निवास; धार्मिक सौदार्हाचे प्रतीक

"गावातील गणेश मंडळाच्या सांस्कृतिक कार्यक्रमापासून गोडी निर्माण झाली. पार्टी ट्रस्टच्या कार्यक्रमात मिमिक्री करून आत्मविश्वास निर्माण झाला. चांडाळ चौकडीमध्ये युवा नेत्याचे पात्र साकारले, तेथून चांगला प्लॅटफॉर्म निर्माण झाला."

-सोन्या एस. साळुंके, (कलाकार, चांडाळ चौकडी)

"आज गावाकडील कलाकार म्हणून बघत असताना आज बऱ्याच जणांची लूटमार वेबसिरीजच्या नावाखाली सुरू आहे. गावाकडच्या कलाकारांना चित्रपटसृष्टीचे आकर्षण वाढत आहे. याचाच फायदा घेत प्रस्थापित छोटे-मोठे दिग्दर्शक निर्माता पैसे गोळा करत आहेत हे प्रामुख्याने थांबले पाहिजे."

-विठ्ठल उत्तमराव आहेर (उलट सुलट-वेबसरीज, लेखक, दिग्दर्शक, कलाकार)

"गावाच्या वेशीच्या आत दम तोडणारे टॅलेंट आम्ही जगासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. आमचे भविष्यातील काही प्रोजेक्ट हे या गावाकडचेच असणार आहेत. आम्ही गावातच वाढलो, शिकलो, त्यामुळे ग्रामीण भागाशी असलेली नाळ आम्ही तोडणार नाहीत."

-गणेश काटकर, दिनेश हिवरकर (CEO नेक्सन मिडिटेक प्रा.लि. कंपनी)

हेही वाचा: Nashik : दुबईच्‍या दांपत्‍याचे संतती स्‍वप्‍न नाशिकमध्ये पूर्ण

Web Title: Web Series Is Proving To Be A Great Platform For Such Actors In Village In Chandori Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top