लग्नसमारंभांना महागाईचे चटके; जेवण थाळी महागल्या | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Thali

लग्नसमारंभांना महागाईचे चटके; जेवण थाळी महागल्या

अभोणा (जि. नाशिक) : प्रत्येक कुटुंबात लग्नसमारंभ म्हटले की, आनंदाचा क्षण असतो. आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी सर्व आप्तेष्टांनी उपस्थित राहावे, त्यांच्यासाठी जेवणावळी द्याव्यात अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. जेवणाचा बेत कसा होता, यावरून विवाहसोहळा कसा आलिशान झाला, याविषयी चर्चा होते. मात्र, पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यात किरणामालाचे व इतर साहित्याचे भाव वाढल्याने केटरिंग व्यवसायाला देखील याचे चटके बसू लागले आहेत.

मेन्यूकार्डमधून मिठाईचे पदार्थ गायब

मागील दोन वर्षांत कोरोना (Corona) महामारीमुळे लॉकडाउन (Lockdown) असल्याने वीस ते पन्नास माणसांच्या उपस्थितीत लग्नसमारंभ पार पडल्याने केटरिंग व्यवसाय व त्याच्याशी संबंधित असणाऱ्या कारागिरांवर उपासमारीची वेळ आली होती. आता परिस्थितीत सुधारणा होऊन पाचशे ते हजार माणसांच्या उपस्थितीत लग्नसमारंभ होत आहेत. त्यामुळे केटरिंग व्यवसायाला पुन्हा बरे दिवस आले असताना वाढत्या महागाईमुळे आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. वाढत्या किमतीमुळे निव्वळ मिळणाऱ्या नफ्यावर त्याचा परिणाम होत आहे. कारागिर व मजुरांचीही मजुरी वाढली आहे. आधीच काही लग्नांच्या तारखा बुक झाल्याने आधीच्या ठरलेल्या किमतीतच कशीबशी जुळवाजुळव करावी लागते आहे. महागाईमुळे केटरिंगचे पॅकेज वाढल्याने मेन्यूकार्डमधून मिठाईचे पदार्थही गायब झाले आहेत. बुफे डिनर व स्वयंपाकासाठी लागणारे भांडे काही केटरिंग व्यावसायिक भाडे तत्वावर आणतात. त्यांचे वाहतूक भाडेही वाढल्याने केटरिंग व्यावसायिकांना त्याची झळ सोसावी लागत आहे.

हेही वाचा: ‘वेडिंग इंडस्ट्री’मध्ये मंगलमय वातावरण! विवाहसोहळ्यांना सुरवात

गेल्यावर्षीच्या तुलनेत झालेली भाववाढ

सोयाबीन तेल ११० रु. किलो १४० रु.

मठ ८० १००

पीठ(५० किलो) १३०० १५००

खोबरे १८० २३०

तूरडाळ ९५ ११०

तांदूळ ३७ ४७

बेसनपीठ ७० ८५

साखर ३७ ४१

मैदा २५ ३०

काजू ६५० ७५०

बदाम ५८० ६८०

गॅस (घरगुती) ७४० ९३०

गॅस(व्याव.) १३०० १९००

मसाले २० टक्के वाढ

भाजीपाला ३५ टक्के वाढ

हेही वाचा: काहीच न करणाऱ्या नगरसेवकांना मतदार दाखवणार घरचा रस्ता | Nashik

''वाढत्या महागाईमुळे आर्थिक जुळवाजुळव करणे कठीण झाले आहे. केटरिंगशी संबंधित सर्वच घटक महाग झाल्याने जुन्या दरात काम करणे अवघड आहे. मिळणारा नफा वाढीव खर्चात जात असल्याने आमच्या हाती काहीच मिळत नाही.'' - विनोद ढुमसे, संचालक, सप्तश्रृंगी केटरर्स, वंजारी (अभोणा)

loading image
go to top