Latest Marathi News | लग्नपत्रिका व्यावसायिकांना यंदा भरघोस ‘कर्तव्य’; विक्रेत्यांना सुगीचे दिवस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Consumers while choosing wedding cards from different types of albums.

Nashik : लग्नपत्रिका व्यावसायिकांना यंदा भरघोस ‘कर्तव्य’; विक्रेत्यांना सुगीचे दिवस

जुने नाशिक : कोरोना प्रादुर्भावामुळे अनेकांनी विवाह सोहळे पुढे ढकलले होते. या वर्षी सामान्य परिस्थिती आणि सर्व निर्बंध उठवल्याने बहुतांशी लोकांनी यंदा कर्तव्य आहे, असे म्हणत विवाह सोहळ्यांना प्रारंभ केला आहे. शिवाय यंदा विवाह मुहूर्त अधिक आहे. त्यामुळे लग्नपत्रिकांना मागणी वाढल्याने व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहे. (Wedding professionals have big duty this year Harvest days for sellers Nashik Latest Marathi News)

कोरोनामुळे लग्नपत्रिका विक्रेता व्यावसायिकांवर मोठा परिणाम झाला. पाच- दहा टक्केही व्यवसाय होऊ शकला नाही. मोठे नुकसान सहन करावे लागले. या वर्षी सामान्य परिस्थिती आहे. सर्व सोहळे उत्साहात होत आहे. वधूवर कुटुंबीयांकडून विवाह सोहळ्यांचीही जोरदार तयारी सुरू आहे. मोठ्या थाटामाटात विवाह सोहळे करण्याचे नियोजन होत आहे. त्यानिमित्ताने नातेवाइकापर्यंत पोचणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रभावी माध्यम अर्थातच लग्नपत्रिका आहे. गेल्या वर्षी काहींनी सोशल मीडिया माध्यमातून सोहळ्याचे निमंत्रण पाठवण्याचा प्रयत्न केला.

परंतु, त्यामुळे होणारा परिणाम आणि दुरावणारे नातेसंबंध लक्षात घेता निमंत्रण पत्रिकेची मागणी वाढली आहे. लग्नपत्रिका व्यावसायिकांचा या वर्षी शंभर टक्के व्यवसाय असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले आहे. शहर, जिल्हा तसेच जिल्ह्याबाहेरील नागरिकदेखील शहरात विविध प्रकारच्या लग्नपत्रिका खरेदीसाठी येत आहे. कागदाचे दर वाढल्याने लग्नपत्रिकादेखील महागली आहे. तरीदेखील लग्नपत्रिका खरेदीसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद असल्याचे विक्रेत्यांनी सांगत समाधान व्यक्त केले. शहरातील येणारा प्रत्येक ग्राहक पाचशे ते १ हजार पत्रिका तर ग्रामीण भागात दीड ते २ हजार पत्रिका खरेदी करत आहे. एक रुपयापासून ते ५०० रुपयांपर्यंत पत्रिका खरेदी-विक्री होत आहे. त्यात एक रुपयापासून १२५ रुपयांपर्यंतच्या पत्रिका खरेदी करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. ग्रामीण भागात धार्मिक इतिहासकालीन देखावे असलेल्या पत्रिका तर शहरात डिझाईन, तसेच साध्या पद्धतीच्या पत्रिकांना अधिक मागणी असल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले.

हेही वाचा: CM Eknath Shinde | आदिवासी भागात रस्त्यांसाठी कालबद्ध कार्यक्रम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

येथून येतात पत्रिका

दिल्ली, अहमदाबाद, तमिळनाडू, शिवकाशी, राजकोट, इंदूर शहर राज्यातून लग्नपत्रिका विक्रीसाठी शहरात येत असतात. दिल्ली स्क्रीन, अहमदाबाद स्क्रीन आणि शिवकाशी येथील लग्नपत्रिकांना अधिक मागणी आहे.

मुस्लिम समाजाचे प्रमाण अधिक

सोशल मीडिया आणि विविध ऑनलाइन संदेश पद्धतीने अनेक जण निमंत्रण देत आहे. त्यामुळे लग्नपत्रिका वाटपावर कुठेतरी अंकुश असल्याचे जाणवत आहे. त्याचा परिणाम म्हणजेच संबंध दुरावत आहे. मुस्लिम समाजातील ग्राहक मात्र आजही हजाराच्या प्रमाणात पत्रिकांचे खरेदी करण्यास येत आहे. प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचून पत्रिका पोच करणे, त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. त्यामुळे त्यांच्याकडून अधिक प्रमाणात लग्नपत्रिका खरेदी केले जाते, अशी माहिती व्यावसायिकांकडून देण्यात आली.

"गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत यंदा ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. लग्नपत्रिका मोठ्या प्रमाणावर खरेदी खरेदी विक्री होत आहे. त्याचे समाधान वाटत आहे. कागदाचे दर वाढल्याने पत्रिकेचे दर ४० टक्क्यांनी वाढले आहे." - रामदास सोमवंशी, व्यावसायिक

हेही वाचा: Nashik Tribal Cultural Festival : आदिवासी नृत्यावर गावितांसह राज्यपालांनीही धरला ठेका!