काही दिवसातचं हे उद्योग पुन्हा भरारी घेण्यासाठी सज्ज होतील- शुभम राजेगावकर

nashik factory.jpg
nashik factory.jpg

नाशिक : कोरोना या संसर्गजन्य विषाणूमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. देशात व आपल्या राज्यातही कोरोनाचा कहर सुरू आहे. दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसतं आहे. त्यामुळे या संकटाचा सामना करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. कोरोनाच्या अनुशंगाने विचार करता लॉकडाऊन मुळे नाशिकचे जेवढे नुकसान होईल तेवढ्यापुरतेचं मर्यादीत नुकसान राहणार आहे. त्याला कारण म्हणजे नाशिक मध्ये कृषी संबंधित व ऑटोमोबॉईल उद्योग मोठ्या प्रमाणात असल्याने या उद्योगांना फारसे नुकसान नाही. त्यामुळे लॉकडाऊन उठविण्याची गरज असून त्यानंतर काही दिवसातचं हे उद्योग पुन्हा भरारी घेण्यासाठी सज्ज होतील. असे सुयोजित इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेडचे संचालक शुभम राजेगावकर यांनी सांगितले.

संकटातून सहजपणे मार्ग काढणे शक्‍य

कोरोनामुळे संपुर्ण जग बेजार झाले आहे. त्यात नाशिक देखील सुटले नाही. परंतु नाशिकच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास काही सकारात्मक बाबी सांगता येतील. आलेल्या संकटाचा सकारात्मक अंगाने विचार केल्यास या संकटातून सहजपणे मार्ग काढणे शक्‍य आहे. नाशिक मध्ये ऍग्रो बेस अर्थात कृषी उद्योग अधिक आहे. त्यामुळे या संकटातून हा व्यवसाय काही प्रमाणात सावरला आहे. त्याचबरोबर ऑटोमोबाईल्स इंडस्ट्री देखील नाशिकमध्ये आहे. त्यापाठोपाठ इलेक्‍ट्रीकल आधारीत उद्योगांचा नाशिक मध्ये समावेश होतो.

लॉकडाऊन मधून नाशिकला वगळल्यास थांबलेले अर्थचक्र पुन्हा सुरु होण्यास मदत

मुंबई, पुणे या शहरांचा विचार केल्यास तेथे माहिती तंत्रज्ञानावर आधारीत मोठ्या प्रमाणात संस्था होत्या. कोरोनामुळे या व्यवसायाला मोठा फटका बसला. नाशिकमध्ये मात्र तशा प्रकारची स्थिती नाही. अर्थात महिंद्रा सारखा मोठा उद्योग गेल्या पंचवीस दिवसांपासून बंद असल्याने त्यावर आधारीत व्हेंडर्स व कच्चा माल पुरवठा दारांचे देखील नुकसान आहे. परंतू मागणी व पुरवठा याचा विचार करता जोपर्यंत लॉकडाऊन आहे तो पर्यंत नुकसान तर होईल. परंतु बाजारात मागणी वाढल्यानंतर हे उद्योग पुन्हा सावरले जाणार आहेत. मुंबई व पुण्याच्या तुलनेत नाशिकमध्ये कोरोनाचा फैलाव अद्याप झालेला नाही. जिल्हा प्रशासन, महापालिका व पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. आतापर्यंत शहरात आढळून आलेल्या कोरोना बाधित रूग्णांची संख्या लक्षात घेता त्यांच्या ट्रॅव्हल हिस्ट्रीचा विचार करता त्या व्यक्ती बाहेरून आल्याचे दिसून येते. त्यामुळे कोरोनाच्या बाबतीत नाशिककरांनी घाबरण्याचे कारण नाही परंतु तेवढीच अधिक काळजी देखील घेतली पाहिजे. शासनाने लॉकडाऊन मधून नाशिकला वगळल्यास थांबलेले अर्थचक्र पुन्हा सुरु होण्यास मदत होईल. किमान कृषी प्रक्रिया उद्योग सुरू केले तरी पुन्हा रोजगाराची संधी निर्माण होणार आहे.


सुयोग्य नियोजन अधिक महत्वाचे 
कोरोना संसर्गजन्य विषाणुचा विचार करताना नागरिकरण अधिक असलेल्या मुंबई, पुणे या शहरांमध्ये अधिक तीव्रता असल्याचे दिसून येते. त्यामुळे येत्या काळात नाशिक मध्ये वास्तव्याला नागरिक अधिक प्राधान्य देतील, असे दिसून येते. नाशिक राहण्यायोग्य शहर असल्याचे कोरोनाच्या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. येथील हवामान, पाण्याची उपलब्धता, मुंबई, पुणे, औरंगाबाद व सुरत शहरापासून जवळचे अंतर, रेल्वे, रस्ते वाहतुक व नव्याने सुरु झालेली हवाई सेवेचा विचार करता दळणवळणाच्या दृष्टीने देखील महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे नाशिकच्या या क्षमता असलेल्या बाबी लक्षात घेवून सुयोग्य नियोजन अधिक महत्वाचे ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com