
Nashik News : अवैध धंदेवाल्यांच्या विरोधात हवालदार बाळकृष्ण पजई यांची अनोखी मोहीम!
Nashik News : ग्रामीण भागात अवैध धंद्यांनी पुन्हा डोके वर काढले असल्याचे लक्षात येताच जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी पुन्हा अवैध धंद्यांवर धडक कार्यवाही सुरू केली आहे. यामुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रथमच दिंडोरी तालुक्यातील उमराळे दूरक्षेत्राच्या गोळशी बीट पोलिस ठाण्याचे हवालदार बाळकृष्ण पजई यांनी अवैध धंद्यांवर हातोडा मारण्यासाठी महिला शांतता व दारूबंदी समिती स्थापन केली आहे.
यामुळे गावातील अवैध धंद्यांना आवर घालण्यास मदत होणार आहे. ही प्रक्रिया संपूर्ण जिल्ह्यात राबवावी, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे. (Women committee formed against illegal traders unique campaign of Havaldar Balkrishna Pajai Nashik News)
जिल्हा पोलीस अधीक्षक उमाप यांनी पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेताच प्रथम अवैध धंद्यांवर टाच मारली. त्यात त्यांना यशही आले.
परंतु ग्रामीण भागातून सध्या पुन्हा अवैध धंदे सुरू झाल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यावर पुन्हा एकदा उमाप यांनी अवैध धंद्यांच्या विरोधात जोरदार मोहीम आखली आहे.
संपूर्ण जिल्हाभरात धाडी टाकून त्यांनी लाखोंच्या ऐवज जप्त करत अवैध धंद्यावाल्यांवर कारवाया केल्या आहेत. तसेच पोलिसांनाही आपापल्या भागात अवैध धंदे चालणार नाहीत, याची खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर दिंडोरी तालुक्यातील उमराळे दूरक्षेत्राच्या गोळशी बीटाचे हवालदार बाळकृष्ण पजई यांनी एक अनोखी शक्कल लढवली आहे. यात बीटातील सर्व गावांमध्ये महिला शांतता व दारूबंदी कमिटी स्थापन करून महिलांना एकत्र आणले आहे.
कायदेशीररित्या अवैध धंद्यावाल्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना कशाप्रकारे मदत करायची, याचे मार्गदर्शन केले आहे. महिला वर्गाला पोलिस संरक्षण देत अवैध धंद्यावाल्यांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेत संयुक्तरीत्या कारवाया सुरू करण्यात आल्या आहे.
यासाठी पजई यांचे मार्गदर्शन महिलांना मोलाचे ठरत आहे. गावातील महिलांना एकत्र आणत गावातील प्रमुख स्थानिक लोकप्रतिनिधींना सोबत घेत महिलांना अवैध धंदेवाल्यांच्या विरोधात एकत्र केले. गावात जुगार खेळताना जरी कोणी आढळले तरी त्यांच्यावर विरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासन हवालदार पजई यांनी दिले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
यासाठी पोलिसांनी महिलांना पोलीस ठाण्याकडून ओळखपत्रही देण्यात आले आहेत. उमराळे दूरक्षेत्राच्या गोळशी बीटातील आंबेगण, धागुर, चाचडगाव, झार्लीपाडा, गोळशी, पिंप्रज, शृंगारपाडा, महाजे आदी गावांतील महिलांना एकत्र करून महिला शांतता व दारूबंदी कमिटी स्थापन करण्यात आली आहे.
महिला एकत्र येऊन गावात काही अवैध व्यवसाय कोणी करण्याचे धाडस करत असेल तर त्यांच्या विरोधात आक्रमक होतात. याविषयी पोलिसांना माहिती देत अवैध धंदेवाल्यांना पकडून देण्याचे काम महिला करीत आहेत.
त्यामुळे या परिसरात अवैध धंद्यांना लगाम लावण्यासाठी महत्त्वाची मदत होत आहे. या कमिटीमध्ये हिराबाई पागे, लंका गायकवाड, यमुना पागे, जनाबाई गायकवाड, मंदाबाई गायकवाड, सखूबाई गायकवाड, कमल चारोस्कर, सुगंधा पागे, यशोदा कोतवाल, विठाबाई वाघ, मंगला इंगळे, शांताबाई झनकर, रेखा इंगळे, योगिता चौधरी, सुरेखा झनकर, रोहिणी चौधरी, अश्विनी इंगळे आदी महिला काम करत आहेत. ग्रामीण भागातील प्रत्येक गावांमध्ये अशी समिती स्थापन होऊन अवैध धंद्यावाल्यांवर धडक कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून पजई यांनी सुरू केलेल्या मोहिमेचे अनुकरण व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.