
नाशिक : आजोबांनी विष्णू सहस्रनाम, शिवमहिम्न हे लहानपणीच करून घेतले होते. त्यामुळे ही आवड जोपासत शिक्षण घेत प्रवासाला सुरवात झाली. जान्हवी परांजपे यांच्याशी संवाद साधताना त्यांनी पौराहित्याचे अनुभव ‘सकाळ’ कडे कथन केले. त्यांचे माहेर कोकणातील महाडचे. वडील रेल्वेत होते. त्यांचे आजोबा हे पौरोहित्यात पारंगत होते. (women rule in priesthood janhvi paranjape nashik Latest Marathi News)
लग्न झाल्यानंतर पतीच्या व्यवसायानिमित्त त्या नाशिकला स्थित झाल्या. स. कृ. देवधर यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी गेल्या असता, महिलाही पौरोहित्य करू शकतात याचा अनुभव आला. १९९० मध्ये राणी भवन येथे वर्गास प्रवेश घेतला.
वीणा मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्षे शिक्षण घेत वेदोक्त शिक्षणासाठी जोशी गुरुजी व साने गुरुजी यांचे सहकार्य लाभले. शुध्द उच्चार व स्पष्टता यामुळे आत्मविश्वास वाढला. कुटुंबाचाही पाठिंबा मिळाला. पौरोहित्य करताना पठण, संथा करताना मुलांचेही स्तोत्रपठण झाले. दररोज होणारे विष्णू सहस्रनाम, रामरक्षा पठण यामुळे घरातील वातावरण सकारात्मक व प्रसन्न आहे.
मंत्राच्या लहरी, स्पंदन यामुळे वातावरणातील प्रसन्नता, उत्साहात अजून भर पडते. पुढचे शिक्षण घेत असताना १५ वर्षे त्यांनी वर्ग घेतले. पौराहित्य करतानाचे अनुभव कथन करताना त्या म्हणाल्या, एका ठिकाणी वास्तुशांती पूजा यजमानांना आवडली.
तिथेच दोन ठिकाणचे आमंत्रण आले. हीच खरी पावती केलेल्या कामाची असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक येथील गोराराम मंदिरात पवमान सूक्त केले तो अनुभवही छान होता. महिलांसाठी भगवद्गीतेचे वर्गही घेतले.
मंत्रपठणाने मनःशांती, मानसिक समाधान मिळते, यामुळे आरोग्यावरही चांगला परिणाम होतो. नकारात्मक विचारांना मनात थारा राहत नाही. यामुळे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो.
सकारात्मक जीवनपद्धतीमुळे आयुष्य हे सुकर व अल्हाददायी होते. गंगा-गोदावरी उत्सवात रुद्र पठणाचे प्रमाणपत्र मिळाले होते. २००५ मध्ये वेगळी वाटेची निवड म्हणून स्मृती इराणी यांचे हस्ते सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले होते, असेही त्यांनी सांगितले.