esakal | नाशिकमध्ये लसीकरणाचा कारभार म्हणजे ‘एक ना धड भाराभर चिंध्या! नागरिक संतप्त
sakal

बोलून बातमी शोधा

vaccination in nashik

नाशिकमध्ये लसीकरणाचा भोंगळ कारभार; नागरिक संतप्त

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : नाशिक महापालिकेतर्फे सिडकोत सध्या लसीकरण मोहिमेपेक्षा ‘लसीकरण केंद्र’वाटप मोहीम जोरदार सुरू आहे; परंतु आता या केंद्रावरील लसीकरणाचा कारभार म्हणजे ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ असा दिसून येत आहे. महापालिकेच्या या भोंगळ व नियोजनशून्य कारभाराला येथील डॉक्टर, केंद्र संचालक व नागरिक पुरते वैतागल्याचे विदारक चित्र बघायला मिळत आहे. (worst-management-of-vaccination-in-Nashik-Citizens-angry-marathi-news)

लसीकरण मोहिमेची पुरती वाट लावल्याचे विदारक दृश्य

कोरोनाला थांबविण्याचा एकमेव पर्याय म्हणजे लसीकरण होय. जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करावे अशा प्रकारचे आवाहन दस्तुरखुद्द मुख्यमंत्री करत आहेत. त्यांच्या अंमलबजावणीची जबाबदारी प्रशासनावर सोपविण्यात आली आहे. सध्या नाशिक शहरात महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचे सर्वेसर्वा बापूसाहेब नागरगोजे ही मोहीम सांभाळत आहेत; परंतु त्यांच्या हाताखालच्या नोडल अधिकाऱ्यांनी तर या लसीकरण मोहिमेची पुरती वाट लावल्याचे विदारक दृश्य सध्या नाशिक शहरासह सिडकोतील केंद्रांवर बघायला मिळत आहे.

अक्षरश: ‘खिरापती’प्रमाणे वाटप

सिडकोत तर लसीकरण केंद्रांचे अक्षरश: ‘खिरापती’प्रमाणे वाटप करण्यात आले आहे. केंद्रवाटप होणे जरी गरजेचे असले तरी लसीकरण मात्र तेवढ्या प्रमाणात होत नसल्याने डॉक्टर, नागरिक व केंद्र संचालकांचा मात्र पुरता हिरमोड झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर केंद्रांची परवानगी घेऊन आपण ‘घोडचूक’ केल्याचेदेखील काही केंद्र संचालक प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे बोलताना दिसून येत आहे. या संदर्भात सिडको मनपा नोडल अधिकारी डॉ. नवीन बाजी यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलण्याचे टाळले.

हेही वाचा: नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसच्या सुरक्षेला छेद; 5 लाख गायब

लसीकरण केंद्रांवरील सूचनाफलक व इतर बाबी

-लसीकरण आज बंद तर उद्या सुरू आहे.

-को-व्हॅक्सिन आहे, कोव्हिशील्ड नाही.

-आज १०० च डोस आहेत. गर्दी करू नये.

-टोकन संपली आहेत. उद्या संपर्क साधा.

-भाऊंनी पाठवले आहे, तर मग मागच्या दाराने या.

-आज फक्त पहिला डोस आहे. दुसऱ्या डोससाठी नंतर या.

-नेटवर्क नसल्याने नोंदणी होत नाही.

-लसीकरण केंद्राबाहेर लोकप्रतिनिधींचे भलेमोठे बॅनर्स आदी प्रकार.

सिडकोत सध्या मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. ही बाब चांगली असली तरी लशींच्या अभावामुळे नागरिकांना खालीहात परत जावे लागत आहे, तर दुसरीकडे केंद्र संचालकांचे नियोजन नसल्यामुळे कोरोनाच्या नियमांची पुरती वाट लागली आहे. त्यामुळे हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे. -योगेश गांगुर्डे, सामाजिक कार्यकर्ते, सिडको

हेही वाचा: मंत्रीपद मिळूनही डॉ. भारती पवारांचा सोज्वळपणा कायम

loading image