Latest Marathi News | जिल्हा परिषदेची 500 कामांवरील स्थगिती जैसे थे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik  Zilla Parishad

Nashik : जिल्हा परिषदेची 500 कामांवरील स्थगिती जैसे थे

नाशिक : गत तीन महिन्यांपासून स्थगिती दिलेल्या जिल्हा परिषदेला २०२१-२२ या आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या ७८ कोटीच्या निधीतील ५०० कामांवरील स्थगिती पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीनंतरही जैसे थे आहे. जिल्हा परिषदेत आढावा बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी सर्व विभाग प्रमुखांची शासकीय विश्राम गृह येथे बैठक घेत यात, पालकमंत्री दादा भुसे यांनी प्रत्येक विभागाकडून कामनिहाय यादी मागवली.

यावेळी झालेल्या चर्चेत विभाग प्रमुखांनी त्यांच्या विभागातील कामांची संख्या सादर केली. मात्र, पालकमंत्री भुसे यांनी प्रत्येक विभागातील कामांची नावनिहाय यादी सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

राज्यातील सत्तांतरानंतर, शिंदे-फडणवीस सरकारने जिल्ह्यातील आमदारांनी २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या मात्र निविदा न राबविलेल्या कामांना स्थगिती दिली होती. त्यामुळे मंजूर ७८ कोटींची ५०० कामे ठप्प होती. पालकमंत्री भुसे यांनी १० ऑक्टोबरला घेतलेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत ही स्थगिती उठवण्याची मागणी केली होती.(Zilla Parishad suspended 500 works Guardian Minister Bhuse called for a work wise list Nashik News)

हेही वाचा: Nashik : जिल्हयात Lumpyने 58 जनावरे मृत; 50 पशुपालकांना अनुदान मंजूर

त्यावर पालकमंत्री भुसे यांनी निधीचे वितरण असमान झाले आहे. त्यामुळे सर्व कामांची तपासणी करून निर्णय घेतला जाईल, असे सांगितले होते. त्यानंतर लागलीच मालेगाव व नांदगाव तालुक्यातील ५०५४ या लेखाशीर्षखालील रस्ते कामांवरील स्थगिती उठविली होती. त्यानंतर या स्थगिती दिलेल्या कामांची पालकमंत्र्यांनी तपासणी केली असावी असे गृहीत धरून जिल्हा परिषदेतील आढावा बैठकीपूर्वी जिल्हा परिषदेने पालकमंत्री यांना प्रत्येक विभागनिहाय कामांची संख्या व स्थगिती असलेल्या कामांचा निधी, अशी माहिती असलेली यादी दिली होती.

त्यामुळे आढावा बैठकीतच पालकमंत्री कामांवरील स्थगिती उठवल्याची घोषणा करतील, अशी जिल्हा परिषद प्रशासनाला अपेक्षा होती. यामुळे आढावा बैठकीत प्रत्येक विभागप्रमुख खर्चाचा आढावा देताना किती कामांवरील किती निधीवर स्थगिती आहे, याची माहिती जाणीवपूर्वक देत होते. पालकमंत्री यांनी पूर्ण बैठकीत या स्थगितीबाबत काहीही भाष्य केले नाही.

हेही वाचा: Nashik : क्रीडा शुल्कात जिल्हाधिकाऱ्यांकडून 50 % माफी; शिक्षकांच्या संघर्षाला यश

मात्र कामांच्या असमान वितरणाबाबत नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. शुक्रवारी (ता.११) आढावा बैठकीनंतर पालकमंत्री भुसे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या सर्व विभागप्रमुखांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे पुन्हा बैठक घेतली.

यावेळी त्यांनी प्रत्येक विभागाची किती रकमेची किती कामांवर स्थगिती आहे, अशा कामांची केवळ संख्या असलेली यादी न देता, प्रत्येक कामाचे नाव, ठिकाण असलेली यादी द्यावी, असे आदेश प्रशासनाला दिले. यामुळे आता प्रशासन पुढील दोन दिवसांत कामांची यादी पालकमंत्र्यांना देणार आहे. त्यानंतर पालकमंत्री या कामांची तपासणी करून स्थगिती उठवण्याचा निर्णय घेतील, असे बोलले जात आहे.

हेही वाचा: Nashik : दादा भुसे यांची शिवभोजन केंद्राला Surprise visit