नशिराबाद पोलिस ठाण्याला ‘आयएसओ’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

‘आयजीं’च्या हस्ते प्रमाणपत्र; आता स्मार्ट पोलिस ठाण्यासाठी प्रयत्न 
जळगाव - जळगाव उपविभागातील एमआयडीसी पोलिस ठाण्याला नुकतेच ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त झाले असून, भुसावळ उपविभागातील नशिराबाद पोलिस ठाण्यानेही ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त केले आहे. संपूर्ण ग्रामीण भागाची हद्द आणि राष्ट्रीय महामार्गाचा व्याप यांसह जातीय तेढ यावर नियंत्रण मिळवत तत्काळ सेवेसह सौजन्याची वागणूक, झीरो पेंडन्सी यांमुळे नशिराबाद पोलिस ठाण्याला ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त झाले आहे. 

‘आयजीं’च्या हस्ते प्रमाणपत्र; आता स्मार्ट पोलिस ठाण्यासाठी प्रयत्न 
जळगाव - जळगाव उपविभागातील एमआयडीसी पोलिस ठाण्याला नुकतेच ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त झाले असून, भुसावळ उपविभागातील नशिराबाद पोलिस ठाण्यानेही ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त केले आहे. संपूर्ण ग्रामीण भागाची हद्द आणि राष्ट्रीय महामार्गाचा व्याप यांसह जातीय तेढ यावर नियंत्रण मिळवत तत्काळ सेवेसह सौजन्याची वागणूक, झीरो पेंडन्सी यांमुळे नशिराबाद पोलिस ठाण्याला ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त झाले आहे. 

जळगाव-नागपूर आशिया महामार्गावर नशिराबाद गावासह इतर छोट्या गावांचा डोलारा. किंचित औद्योगिक वसाहत परिसराचा भाग अशी संमिश्र हद्द असणाऱ्या नशिराबाद पोलिस ठाण्यांतर्गत हद्दीतील गुन्हेगारी मोडीत काढत गावातील जातीय सलोखा अबाधित राखण्यात पोलिस ठाण्याने बाजी मारली आहे. एरवी गणेशोत्स, मोहरम आदी सणांमध्ये जातीय तेढ निर्माण करणाऱ्या घटनांचे सातत्य पाहता सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ आणि कर्मचारी, अधिकाऱ्यांनी संवेदनशील पोलिस ठाण्याची ओळख पुसून काढत तत्पर सेवेचा वसा घेतला. 

शिस्तबद्धता आणि तत्परता
पोलिस ठाण्यात एखादा गुन्हा दाखल झाला की, तपासानंतर खटला न्यायालयात पाठविल्यावर त्याचे दस्त मिळणे दुरापास्त होते. शोधून मिळालेले दस्तांची अवस्थाच वाईट असते. मात्र, रेकॉर्ड मेंटेनसाठी पोलिस ठाण्यात खास व्यवस्था करण्यात आली आहे. मुद्देमाल, गुन्ह्यातील जप्त ऐवजाची वर्गवारी नीटनेटकी ठेवण्यात आली आहे. 

जनमताचा अंदाज जाणला
‘आयएसओ’प्राप्त होण्यापूर्वी संबंधित एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी तीन ते चार दिवस पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जनमताचा अंदाज जाणून घेतला. पोलिस अधिकारी व पोलिस ठाण्याबाबत प्रतिक्रिया नोंदवून ग्रामस्थांचा कल नोंदवण्यात आला. पोलिस ठाण्यात हजर कर्मचारी अधिकाऱ्यांचे घडल्या घटनेतील रिस्पॉन्स तपासण्यात आला. 

महानिरीक्षकांच्या हस्ते प्रमाणपत्र 
नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विनयकुमार चौबे दोन दिवस जिल्हा पोलिस दलाच्या इन्स्पेक्‍शनसाठी आले असताना नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक राहुल वाघ यांना ‘आयएसओ’ प्रमाणपत्र महानिरीक्षक चौबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, अप्पर अधीक्षक मोक्षदा पाटील, भुसावळ भागचे अप्पर अधीक्षक नीलोत्पल, परिविक्षाधीन अधिकारी मनीष कलवानिया, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष गायकवाड आदींची यावेळी उपस्थिती होती. 

कायदा- सुव्यवस्था सांभाळण्यासह शिस्त आणि नेमक्‍या वेळेत जनतेला सेवा मिळावी, यासाठी अधिकाऱ्यांना प्रोत्साहित केले. वरिष्ठ म्हणून मार्गदर्शन केले. संबंधित अधिकाऱ्यांनीही दिलेल्या सूचनांचे पालन करून मेहनत घेतली. एमआयडीसी, नशिराबाद पोलिस ठाणे जातीय तेढ असलेल्या संवेदनशील हद्दीचे असल्याने अधिकारी-कर्मचारी कार्यतत्पर असणे अपेक्षितच आहे. माझ्या कारकिर्दीत दोन पोलिस ठाण्यांना ‘आयएसओ’ मिळाल्याचे समाधान आहे.

- डॉ. जालिंदर सुपेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक

Web Title: nashirabad police station iso