‘हे’ बाळासाहेब नवाजुद्दीनपेक्षा भारी

‘हे’ बाळासाहेब नवाजुद्दीनपेक्षा भारी

अंबड - असे म्हणतात, की जगात एकाच चेहऱ्याचे सात जण असतात; परंतु त्यांपैकी एखादाच चेहरा आपल्याला कधीतरी बघायला मिळतो. तोच चेहरा जर का एखाद्या नामवंत सेलिब्रिटीसारखा दिसत असेल, तर समोरच्या व्यक्तीच्या तोंडात सहज त्या सेलिब्रिटीचे नाव येते आणि मिळताजुळता चेहरा असलेली व्यक्तीही सेलिब्रिटी बनते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चेहऱ्याशी तंतोतंत मिळताजुळता चेहरा लाभलेले विवेक महादेव देवरे असेच एक भाग्यवान आहेत. त्यांना पाहताच शिवसेनाप्रमुखांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.   

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या व्यक्तिमत्त्वाचा बुधवारी, २३ जानेवारीला जन्मदिन आहे. त्यांच्या जीवनावर सध्या सिनेमागृहात हिंदी चित्रपट ‘ठाकरे’ येत आहे. या सिनेमात शिवसेनाप्रमुखांची भूमिका केलेल्या नवाजुद्दीन सिद्दिकीपेक्षा श्री. देवरे ‘लय भारी’ ठरले आहेत. विवेक देवरे (वय ४१) मूळचे रावळगाव (ता. मालेगाव) येथील. गेल्या काही वर्षांपासून ते आपल्या परिवारासह नाशिक येथील सिडकोत स्थायिक झाले आहेत. आई-वडील, दोन भाऊ, पत्नी व दोन मुले, असा त्यांचा परिवार आहे. त्यांच्या या बाळासाहेबरूपी चेहऱ्यावर सध्या हजारो शिवसैनिक व बाळासाहेबप्रेमी त्यांना भेटण्यासाठी, फोटो व सेल्फी काढण्यासाठी आतुर होत असल्याचे चित्र बघायला मिळते. 

बाळासाहेबांची गोल्फ क्‍लबवर सभा ऐकल्यानंतर विवेक त्यांचे फॅन झाले. त्यानंतर त्यांनी पांढरा कुर्ता आणि पायजमा घालण्यास सुरवात केली. त्याचदिवशी त्यांना पत्नीने सांगितले, ‘तुम्ही अगदी बाळासाहेबांसारखे दिसता.’ त्यांच्या कार्यालयातसुद्धा मित्रपरिवार त्यांना बाळासाहेबांच्या नावानेच हाक मारतात. बाळासाहेबांप्रमाणे पोशाख करून जेव्हा त्यांनी नाशिक ते कोल्हापूर असा प्रवास केला, तेव्हा सर्व जातिधर्मातील लोकांकडून त्यांना प्रेमाचा अनुभव आला. नाशिक- पुणे महामार्गावर हॉटेलमध्ये ते गेले असता, हॉटेलच्या बाजूला असलेल्या दुकानात मुलांसाठी वस्तू घ्यायला गेले. तेथे दुकानमालक त्यांच्याकडे बघतच राहिला. अचानक त्याच्या डोळ्यांत पाणी येताना दिसले. त्यांना विचारले असता, ते म्हणाले, ‘तुम्हाला बघून आज बाळासाहेबांची आठवण झाली’. अशा शब्दांत त्यांनी बाळासाहेबांवरील प्रेम दाखवून दिले.  

सिग्नलवर उभे असताना शाळेची व्हॅन उभी राहिली. त्यात पाच ते सहा वर्षे वयाच्या मुली होत्या. मी अगदीच बाजूला उभा होतो. त्या व्हॅनमधील एका गोंडस मुलीने हसत प्रश्‍न विचारला, ‘काका, तुम्ही बाळासाहेब ठाकरे आहेत ना! तुमचा फोटो आहे आमच्या घरात.’ ते ऐकून मी निःशब्द झालो आणि माझ्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या, असे विवेक देवरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com