स्थायी समितीत आठ नवे चेहरे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

धुळे - येथील महापालिकेच्या स्थायी समितीत आठ नवीन सदस्यांची, तर महिला व बालकल्याण समितीच्या सर्व ११ सदस्यांची आज विशेष महासभेत निवड झाली. स्थायी समितीत नव्याने आलेल्या आठ सदस्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, तर शिवसेना, भाजप, काँग्रेस व शहर विकास आघाडीच्या प्रत्येकी एका सदस्याचा समावेश आहे. महिला व बालकल्याण समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा, काँग्रेसचा एक व शिवसेना आणि शहर विकास आघाडीच्या प्रत्येकी दोन सदस्यांचा समावेश आहे.

धुळे - येथील महापालिकेच्या स्थायी समितीत आठ नवीन सदस्यांची, तर महिला व बालकल्याण समितीच्या सर्व ११ सदस्यांची आज विशेष महासभेत निवड झाली. स्थायी समितीत नव्याने आलेल्या आठ सदस्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, तर शिवसेना, भाजप, काँग्रेस व शहर विकास आघाडीच्या प्रत्येकी एका सदस्याचा समावेश आहे. महिला व बालकल्याण समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा, काँग्रेसचा एक व शिवसेना आणि शहर विकास आघाडीच्या प्रत्येकी दोन सदस्यांचा समावेश आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीच्या १६ सदस्यांपैकी आठ सदस्यांचा कार्यकाळ एक जानेवारीला, तर महिला व बालकल्याण समिती सदस्यांचा २२ जानेवारीला संपत आहे. या सदस्यांच्या जागेवर नवीन सदस्यांची निवड करण्यासाठी आज सकाळी अकराला विशेष महासभा झाली. महापौर कल्पना महाले पीठासीन अधिकारी होत्या. आयुक्त संगीता धायगुडे, उपमहापौर उमेर अन्सारी, प्रभारी नगरसचिव मनोज वाघ व नगरसेवक उपस्थित होते.
सभेत सुरवातीला स्थायी समितीच्या आठ सदस्यांची निवड प्रक्रिया झाली.

त्या-त्या पक्षाच्या गटनेत्यांनी आपल्या गटातर्फे सदस्यांची नावे बंद पाकिटात दिली होती. ही पाकिटे महापौर श्रीमती महाले यांनी उघडली. हीच प्रक्रिया नंतर महिला व बालकल्याण समिती सदस्यांसाठी राबविण्यात आली. श्रीमती महाले यांनी निवड झालेल्या सदस्यांची नावे जाहीर केली. निवड झालेल्या सदस्यांचे पदाधिकारी, नगरसेवकांनी स्वागत केले.

नवीन चेहरे असे
स्थायी समिती - राष्ट्रवादी काँग्रेस- कमलेश देवरे, यमुनाबाई जाधव, दीपक शेलार व कैलास चौधरी. काँग्रेस- शेख हजराबी मोहंमद. शिवसेना- ज्योत्स्ना पाटील. भाजप- वालीबेन मंडोरे. शहर विकास आघाडी- गुलाब महाजन.
महिला व बालकल्याण समिती - राष्ट्रवादी काँग्रेस- कल्पना बोरसे, इंदूबाई वाघ, इंदूबाई बोरसे, चंद्रकला जाधव, अन्सारी अफजलुन्निसा फजलुर्रहमान, अन्सारी हलिमाबानो मोहंमद शाबान. शिवसेना- वैशाली लहामगे, शकुंतला जाधव. शहर विकास आघाडी- माधुरी अजळकर, प्रभावती चौधरी. काँग्रेस- मोमीन आतियाबानो दोस्त मोहंमद.

पाच सदस्यांची दुसऱ्यांदा वर्णी
महिला व बालकल्याण समितीत विद्यमान उपसभापती कल्पना बोरसे, सदस्या इंदूबाई वाघ, इंदूबाई बोरसे, अन्सारी अफजलुन्निसा फजलुर्रहमना व माधुरी अजळकर या पाच सदस्यांची पुन्हा वर्णी लागली आहे. श्रीमती बोरसे यांना सभापतिपद मिळण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

स्थायी सभापतिपदाकडे लक्ष
स्थायी समितीत आठ नवीन सदस्यांची निवड झाल्यानंतर आता सभापतिपदी कोण विराजमान होणार याकडे लक्ष आहे. समितीतील मायादेवी परदेशी यांनी गेल्या वेळी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, सोनल शिंदे यांना संधी मिळाली. त्यामुळे आता श्रीमती परदेशी या सभापतिपदासाठी दावा करण्याची दाट शक्‍यता आहे. नव्याने आलेल्या कैलास चौधरी व दीपक शेलार यांच्यापैकी एकाची वर्णी लागू शकते, अशीही चर्चा आहे.

सभागृहात बाहेरच्या व्यक्ती
सदस्य निवडीसाठी बोलावलेल्या विशेष महासभेत आज नगरसेवकांच्या खुर्च्यांवर इतर बाहेरच्या व्यक्तीही दिसून आल्या. यातील काही जण नगरसेवकांसोबत आलेले तर काही नगरसेवकांचे नातेवाईक तर एखाद-दोन जणांनी कुणाचाही संबंध नसताना सभागृहात ठाण मांडल्याचे पाहायला मिळाले. मात्र, त्यांना कुणीही हटकले नाही, यामुळे महासभेचे गांभीर्यच प्रशासनाला नाही हेच पुन्हा दिसून आले.

Web Title: new candidate in standing committee