शपथविधी होईपर्यंत आम्ही होतो साशंक 

योगेश महाजन
Wednesday, 4 December 2019

अमळनेर ः सत्ता स्थापनेचा पेचप्रसंग असताना कमालीची अस्वस्थता व बेचैनी होती. शपथविधी होईपर्यंत आम्ही साशंक होतो. मात्र, आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आमदारांशी विचारविनिमय करून सर्वांना विश्वास देत होते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी सांगितले. 

अमळनेर ः सत्ता स्थापनेचा पेचप्रसंग असताना कमालीची अस्वस्थता व बेचैनी होती. शपथविधी होईपर्यंत आम्ही साशंक होतो. मात्र, आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आमदारांशी विचारविनिमय करून सर्वांना विश्वास देत होते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी सांगितले. 
सत्ता स्थापनेनंतर आमदार अनिल पाटील मतदारसंघात परतले असून, त्यांनी महिनाभरातील आलेला अनुभव कथन केला. आमदार पाटील म्हणाले, की सुरवातीला शरद पवार यांनी विरोधात राहण्याची भूमिका घेतली होती. भाजप- शिवसेना महायुतीचे बहुमत असल्याने त्यांनी सरकार स्थापन करावे असेही त्यांचे म्हणणे होते. मात्र, त्यांच्यात एकमत न झाल्याने युती बिनसली. त्यानंतर श्री. पवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तिन्ही पक्षाची सूत्रे हातात घेतली. त्यांनी ज्या पद्धतीने सर्व सूत्रे हाताळली त्यातून आमच्यात एक आत्मविश्वास निर्माण झाला. श्री. पवार यांनी जे करून दाखवलं ते संपूर्ण देशानेही पाहिले आहे. मीडियातून येते असलेल्या व ऐकीव माहितीवरून सत्ता स्थापनेबाबत काय होईल हे सांगता येणे कठीण होते. भाजपची मंडळी यात माहीर असल्याने भाजपच सत्तेत येईल, असे त्यांच्याकडून वातावरण तयार करण्यात आले होते. मात्र, श्री. पवार यांनी त्यांचे सर्व डाव हाणून पाडले. 

मंत्रिपदाचा निर्णय वरिष्ठांचा 
जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील स्थिती पाहता खानदेशात राष्ट्रवादी काँग्रेसचे आपण एकमेव आमदार म्हणून निवडून आलो आहोत. या पार्श्वभूमीवर आपणास मंत्रिपद मिळावे, अशी मागणी वरिष्ठ नेत्यांकडून पक्षश्रेष्ठींकडे होऊ शकते. मात्र, हा निर्णय सर्वस्वी पक्षश्रेष्ठींचा राहील. तो जे निर्णय घेतील तो आपणास मान्य राहील. पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आपण आपले कार्य सुरू ठेवू, असेही आमदार पाटील यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new gorvment Until the oath was in doubt, we were in doubt